spot_img

LPG Crisis : इराण-अमेरिका युद्ध आणि रिकामी चूल: जनतेच्या पोटावर पाय, पण राज्यकर्ते निवडणूक प्रचारात मग्न!

spot_img

गॅस टंचाईने देशात हाहाकार; मोदींचा केरळमध्ये प्रचार तर फडणवीसांचा माध्यमांवरच प्रहार

इराण-अमेरिका-इस्राईल (Iran USA Israil) युद्धाची झळ आता तुमच्या आणि माझ्या घराच्या किचनपर्यंत येऊन पोहोचली आहे. एकीकडे इराण आणि अमेरिका यांच्यात घमासान युद्ध सुरू आहे, आणि त्याचे थेट चटके बसू लागलेत आपल्या भारताला! या सगळ्या कठीण परिस्थितीत आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्यावेळी देशाने सावध राहायला हवे, नियोजन करायला हवे, त्यावेळी आपले राज्यकर्ते नक्की काय करत आहेत? आज देशात गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झालाय. हॉटेल्स बंद पडतायत, लग्नकार्य पुढे ढकलली जातायत आणि साध्या कष्टकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जातोय. पण या गंभीर परिस्थितीतही आपल्या प्रधानमंत्र्यांना निवडणुकीचा प्रचार जास्त महत्त्वाचा वाटतोय. आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले तर ते माध्यमांनाच दोषी ठरवतायत.

इराण-अमेरिका वादाचा परिणाम म्हणून कच्च्या तेलाचे भाव वाढले आणि गॅस पुरवठा खंडित झाला. आज महाराष्ट्रासह देशातील अनेक शहरांमध्ये चित्र काय आहे? तर हॉटेल्स बंद आहेत, खाणावळींना टाळे लागली आहेत. ज्या गरिबांचे पोट रोजच्या मजुरीवर चालते, ज्यांचे अन्नछत्र गॅसअभावी बंद पडले आहे, त्यांच्या पोटाची खळगी कोण भरणार? कॅटरिंग व्यवसाय पूर्णपणे कोलमडलाय. लोकांच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण, म्हणजे लग्न सोहळे, गॅस नसल्यामुळे पुढे ढकलावे लागत आहेत. ही आणीबाणीपेक्षा कमी गंभीर परिस्थिती नाही. जेव्हा सामान्य जनता रस्त्यावर रांगा लावून उभी आहे, तेव्हा सरकार काय करत आहे?

अशा परिस्थितीत देशाच्या प्रधानमंत्र्यांकडून काय अपेक्षा असते? त्यांनी दिल्लीत बसून परिस्थिती हाताळायला हवी, इंधन पुरवठा कसा सुरळीत होईल हे पाहायला हवे. संसदेत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून देशातील जनतेला योग्य ती माहिती दिली पाहिजे. पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या कुठे आहेत? ते पश्चिम बंगाल आणि केरळच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मग्न आहेत! केरळमध्ये जाऊन ते काय म्हणतात? ते म्हणतात की, ‘विरोधक युद्धजन्य परिस्थितीचे राजकारण करून लोकांमध्ये भीती पसरवत आहेत.’ प्रधानमंत्री महोदय, भीती विरोधक पसरवत नाहीत, तर रिकामे गॅस सिलिंडर आणि वाढलेले भाव पसरवत आहेत! जेव्हा लोकांकडे स्वयंपाकासाठी इंधन नाही, तेव्हा त्यांना सत्य सांगणे म्हणजे राजकारण करणे असते का? जनतेच्या प्रश्नांना ‘पॅनिक’ म्हणणे, हा जनतेचा अपमान नाही का? आणि राजकारण कोण करतय? संसदेत या गंभीर प्रश्नावर चर्चा करणारे की निवडणुकीच्या प्रचारासाठी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात फिरणारे?

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांना जेव्हा माध्यमांनी या परिस्थितीवर प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी अत्यंत बेजबाबदारपणे माध्यमांवरच खापर फोडले. ते म्हणतात की, माध्यमं विनाकारण गोंधळ निर्माण करत आहेत. अहो फडणवीस साहेब, जर माध्यमं गोंधळ निर्माण करत असतील, तर मग विधानभवनातील कँटीन काल का बंद पडले? खुद्द विधानसभेत काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा मांडला की, जिथे कायदे बनतात, तिथेच गॅस नाहीये! वडेट्टीवार म्हणाले की त्यांना रात्रीचं जेवण मिळाल नाही. जर सरकार आपल्या स्वतःच्या कँटीनला गॅस देऊ शकत नसेल, तर सामान्य जनतेला काय देणार? हे वास्तव दाखवणे म्हणजे ‘गोंधळ’ घालणे आहे का? की आपली निष्फळता झाकण्यासाठी हा माध्यमांवरचा राग आहे?

देश एका मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर असताना, सत्ताधाऱ्यांच्या देहबोलीतून किंवा बोलण्यातून परिस्थितीचे गांभीर्य कुठेही दिसत नाही. प्रधानमंत्री निवडणुक तयारीत, जुमलेबाजीत व्यस्त आहेत आणि मुख्यमंत्री ‘ऑल इज वेल’ म्हणण्यात धन्यता मानत आहेत. हे लोकशाहीचे दुर्दैव आहे की, जेव्हा जनतेला अन्नाची आणि इंधनाची चिंता असते, तेव्हा नेत्यांना फक्त खुर्चीची आणि मतांची चिंता असते. पण इथे तर तेही दिसत नाही. जर ही परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळली नाही गेली व त्याचा जनतेला त्रास झाला तर जनता आपल्याला पुढच्या निवडणुकीत पराभूत करेल ही भीतीच मुळात राज्यकर्त्यांमध्ये राहिलेली नाही. गॅसचा तुटवडा ही काही नैसर्गिक आपत्ती नाही, तर ते नियोजनाचे अपयश आहे. आणि हे अपयश लपवण्यासाठी विरोधकांवर आणि माध्यमांवर टीका करणे, हे अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण आहे.

आज विधानभवनाचे कँटीन बंद झाले, उद्या सामान्य माणसाच्या घरची चूल कायमची विझण्याची वेळ येईल. कदाचित या गॅस संकटांमुळे चूलच पेटवावी लागेल, पण आपले नेते मात्र भाषणांमध्ये मश्गूल राहतील. इराण-अमेरिकेचे युद्ध हे आंतरराष्ट्रीय राजकारण असेलही, पण त्याचे भारतीय जनतेवर होणारे परिणाम रोखणे ही सरकारची जबाबदारी आहे. प्रधानमंत्री मोदी म्हणतात की, कोविडची परिस्थिती ज्या पद्धतीने केंद्राने हाताळली तशीच ही परिस्थितीही केंद्र सरकार हाताळेल. याचा अर्थ कोविडमध्ये लोकांची जशी अवस्था झाली, लोक ऑक्सिजन सिलेंडरअभावी मृत्युमुखी पडले , तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण होणार का? जर तुम्ही जनतेला सुरक्षा आणि जीवनावश्यक वस्तू देऊ शकत नसाल, तर तुम्हाला सत्तेवर राहण्याचा अधिकार काय? मोदीजी, केरळमध्ये जाऊन विरोधकांवर आरोप करण्यापेक्षा दिल्लीत बसून गॅसची समस्या कशी सोडवता येईल यावर लक्ष द्या. आणि फडणवीस साहेब, माध्यमांना शिकवण्यापेक्षा कँटीन आणि राज्यातील खाणावळी कशा सुरू होतील, हे बघा! आज जगातील व भारतातील ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. सत्ताधाऱ्यांची असंवेदनशीलता आज रसातळाला जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ