५ डिसेंबरच्या ऐतिहासिक यशानंतर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ १९ मार्चला सिनेमागृहात धडकणार असून, चित्रपटाचा क्लायमॅक्स आणि संभाव्य तिसऱ्या भागाच्या हिंटमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
भारतीय सिनेसृष्टीत सध्या ‘धुरंधर’ या नावाची मोठी लाट पाहायला मिळत आहे. ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागाने जगभरात धुमाकूळ घातल्यानंतर, आता उद्या म्हणजेच १९ मार्च रोजी या चित्रपटाचा दुसरा भाग ‘धुरंधर: द रिव्हेंज’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांनी प्रदर्शनापूर्वीच चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधला असून, चित्रपटगृहात येणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक विशेष विनंती केली आहे.
आदित्य धर यांनी आपल्या पोस्टमध्ये चाहत्यांचे आभार मानताना म्हटले आहे की, पहिल्या भागाला प्रेक्षकांनी जे भरभरून प्रेम दिले, ती एका दिग्दर्शकासाठी सर्वात मोठी भेट आहे. “दुसरा भाग बनवताना प्रेक्षकांना अनपेक्षित धक्का देण्याचे आमचे ध्येय होते. चित्रपटातील प्रत्येक वळण (Twist) आणि भावना तुम्हाला थेट थिएटरमध्येच अनुभवायला मिळावी, यासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेतली आहे,” असे त्यांनी नमूद केले. तसेच, चित्रपटाची मजा टिकवून ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे ‘स्पॉइलर्स’ सोशल मीडियावर शेअर करू नका, असे कळकळीचे आवाहन त्यांनी प्रेक्षकांना केले आहे.
मात्र, या संपूर्ण पोस्टमध्ये नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले ते एका विशेष वाक्याने. आदित्यने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “चित्रपटाची श्रेयनामावली (End Credits) पूर्णपणे संपेपर्यंत आपली जागा सोडू नका.” या एका विधानामुळे सिनेप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, चित्रपटाच्या शेवटी ‘धुरंधर ३’ ची अधिकृत घोषणा किंवा एखाद्या नवीन पात्राची एन्ट्री होऊ शकते, असा कयास लावला जात आहे. त्यामुळे उद्याचा दिवस ‘धुरंधर’च्या चाहत्यांसाठी खरोखरच सस्पेन्सने भरलेला असणार आहे.




