ओतूरमधील गाडगे महाराज विद्यालयातील थरार; जुन्या वादातून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ओतूर,प्रतिनिधी:दि,१७ मार्च ( रमेश तांबे )
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे सोमवारी सकाळी एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. येथील गाडगे महाराज विद्यालयात दहावीची परीक्षा सुरू असताना, एका अल्पवयीन मुलाने आपल्या चार साथीदारांसह परीक्षा केंद्रात घुसून एका परीक्षार्थी विद्यार्थ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. सोमवारी १६ मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास, इतिहासाचा पेपर सुरू होण्यापूर्वी ही घटना घडली. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षेची पहिली बेल झाल्यानंतर सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गात बसले होते. यावेळी संशयित आरोपी तरुण शाळेचे दप्तर पाठीवर अडकवून आपल्या साथीदारांसह वर्गात शिरला. वर्गाचा दरवाजा आतून लावून घेत त्याने दप्तरातून कोयता काढला आणि थेट एका विद्यार्थ्यावर हल्ला चढवला. संबंधित विद्यार्थ्याने प्रसंगावधान राखत वार हातावर झेलल्यामुळे त्याचा जीव वाचला, मात्र तो गंभीर जखमी झाला आहे. वर्गातील इतर विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केल्यामुळे तातडीने हस्तक्षेप करण्यात आला आणि पोलिसांनी हल्लेखोर मुलाला कोयत्यासह रंगेहात पकडले.
ओतूर पोलिसांनी या प्रकरणी ऋतीक सचिन सोनवणे (रा. डिंगोरे) आणि त्याच्यासोबत असलेल्या चार अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतले आहे. हा संपूर्ण थरार शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहु थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नरेंद्र गोराणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. परीक्षा केंद्रात अशा प्रकारे शस्त्र घेऊन प्रवेश झाल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.




