बेंगळुरूमध्ये रील बनवण्यासाठी बापाच्या जीवाशी खेळ; संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक कोणत्या थराला जातील, याचा काही नेम उरलेला नाही. कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये एक असाच संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे, जिथे एका महिलेने चक्क आपल्या वृद्ध वडिलांना गोणीत भरून ‘कुरिअर’ (पार्सल) म्हणून पाठवण्याचा अघोरी प्रयत्न केला. विनायक सर्कल परिसरातील एका कुरिअर सेंटरमध्ये ही घटना घडली असून, याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक महिला तिच्या पती, सासू आणि दिरासह कुरिअर सेंटरवर एक मोठे पार्सल घेऊन पोहोचली होती. पार्सलचा आकार आणि त्यातील हालचाल पाहून तिथल्या कर्मचाऱ्यांना संशय आला. जेव्हा त्यांनी विचारणा केली, तेव्हा कुटुंबाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. संशय बळावल्याने कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने ते पोते उघडायला लावले. पोते उघडताच समोरचे दृश्य पाहून कर्मचाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली; त्या गोणीतून एक वृद्ध व्यक्ती बाहेर आली. दीर्घकाळ गुदमरल्यामुळे त्या वृद्धाला श्वास घेण्यासही त्रास होत होता.
या प्रकारानंतर कुरिअर सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. मात्र, पोलीस येण्यापूर्वीच ते कुटुंब तिथून पसार झाले. पोलिसांनी नंतर शोध घेऊन चौकशी केली असता, या कुटुंबाने दिलेले कारण धक्कादायक होते. शहरातील बस तिकिटांच्या वाढत्या दरांचा निषेध करण्यासाठी आणि सोशल मीडियावर लक्ष वेधून घेण्यासाठी ते एक ‘रील’ (व्हिडिओ) बनवत होते, असा दावा त्यांनी केला. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी एका वृद्ध व्यक्तीच्या जिवाशी खेळणाऱ्या या कुटुंबाला पोलिसांनी चांगलेच धारेवर धरले. अखेर समुपदेशनानंतर या कुटुंबाने आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली आहे.




