Ketan Agrawal Case : सरप्राइज पार्टीचा कट की अपघात? दोन्ही बाजूंच्या दाव्या-प्रतिदाव्यांमुळे गुंतागुंत वाढली

spot_img

*वडिलांचा आरोप– सियाच्या वाढदिवसाचे निमित्त काढून चेतननेच केतनला लोहगडावर बोलावले; तर आरोपीच्या वडिलांचा दावा– मुलीला ट्रेकिंगची आवडच नव्हती

महाराष्ट्रभर खळबळ उडवून देणाऱ्या लोहगड येथील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाला (Ketan Agrawal Case) आता एक नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात आता केतन आणि संशयित आरोपी सिया गोयल या दोन्ही बाजूंच्या कुटुंबीयांनी प्रसारमाध्यमांसमोर येत एकमेकांवर अतिशय गंभीर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी या घटनेमागे सुनियोजित कट असल्याचा खळबळजनक दावा केला आहे, तर मुख्य आरोपी सियाचे वडील प्रवीण गोयल यांनी आपल्या मुलीची बाजू मांडत हा एक अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला आहे.

केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, १४ आणि १५ जून रोजी केतन आणि मुख्य आरोपी चेतन चौधरी यांच्यात फोनवर संभाषण झाले होते. हे बोलणे सियानेच स्वतःहून करून दिले होते. या संभाषणादरम्यान चेतनने केतनला सांगितले होते की, “सियाच्या वाढदिवसानिमित्त तिला एक विशेष ‘सरप्राइज’ देण्यासाठी आम्ही सर्व मित्र-मैत्रिणींनी लोहगडावर एका पार्टीचे आयोजन केले आहे. त्यामुळे तू १८ जून रोजी सियाला सोबत घेऊन तिथे ये.” वडिलांच्या दाव्यानुसार, याच नियोजनाप्रमाणे केतन १८ जून रोजी सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी सियाला सोबत घेऊन लोहगडाकडे जाण्यासाठी निघाला होता. मात्र, तिथं पोहोचल्यानंतर अवघ्या अडीच तासांत, म्हणजेच पावणे अकराच्या सुमारास सियाची आई पूजा गोयल यांनी केतनच्या आईला फोन करून केतन दरीत पडल्याची धक्कादायक माहिती दिली.

दुसरीकडे, आरोपी बाजूने हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. सियाचे वडील प्रवीण गोयल यांनी माध्यमांसमोर येत सांगितले की, त्यांच्या मुलीला ट्रेकिंगची अजिबात आवड नव्हती. उलट केतनच तिला वारंवार ट्रेकिंगला येण्यासाठी आग्रह करायचा. या संदर्भातील काही जुने मेसेजेस देखील सियाने कुटुंबीयांना दाखवले होते, असा दावा त्यांनी केला आहे.

केतनच्या वडिलांनी केलेल्या या मोठ्या खुलाशामुळे या हत्येचा कट खूप आधीपासून आणि अत्यंत पद्धतशीरपणे रचला गेला होता, या पोलिसांच्या संशयाला आता मोठे बळ मिळाले आहे. दुसरीकडे आरोपी बाजू याला निव्वळ एक अपघात दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. दोन्ही बाजूंचे हे परस्परविरोधी दावे समोर आल्यानंतर आता लोणावळा आणि पुणे ग्रामीण पोलीस कॉल रेकॉर्ड्स (CDR), व्हॉट्सॲप चॅट्स आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे या प्रकरणातील नेमके सत्य शोधून काढत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ