कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम होऊ लागला असून, पंचगंगा नदीच्या पाणीपातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसाचा थेट परिणाम नदीच्या प्रवाहावर होत असून, गेल्या 24 तासांत पंचगंगा नदीची पातळी तब्बल दोन फुटांनी वाढून 14.2 फूटांवर पोहोचली आहे. नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे नदीकाठच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे.
सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक बंधाऱ्यांवरही पाण्याचा दबाव वाढला असून, आतापर्यंत तीन बंधारे पाण्याखाली गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये शिंगणापूर बंधाऱ्याचाही समावेश असून, हा बंधारा पूर्णपणे ओव्हरफ्लो झाल्याने स्थानिक प्रशासनाची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, बंधाऱ्यांवर पाणी वाहत असतानाही काही ठिकाणी वाहनांची आणि नागरिकांची ये-जा सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने वारंवार इशारे दिले आहेत.
हवामान विभागाने पुढील काही दिवसही कोल्हापूर आणि धरण क्षेत्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांवरून प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




