Russia-Iran : अमेरिका-इराण संघर्षात रशियाचा मोठा ‘गेम’; ३० शक्तीशाली सुखोई Su-35 लढाऊ विमाने इराणला मिळणार!

spot_img

युद्ध विरामाच्या आडून हालचाली वेगवान; अत्याधुनिक रशियन विमानांमुळे अमेरिका आणि इस्रायलची चिंता वाढणार

अमेरिका आणि इराण यांच्यात सध्या वरवर युद्ध विराम (सीजफायर) दिसत असला, तरी दोन्ही देशांमध्ये कोणताही कायमस्वरूपी शांतता करार झालेला नाही. या युद्ध विरामाच्या आडून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गुप्तपणे किंवा उघडपणे हल्ले करण्याचे सत्र सुरूच आहे. याच अत्यंत संवेदनशील काळात आता रशियाने मध्यपूर्वेतील (Middle East) भू-राजकीय समीकरणे बदलणारा एक मोठा डाव टाकला आहे. रशिया लवकरच इराणच्या हवाई दलाला अधिक मजबूत करण्यासाठी ३० अत्याधुनिक ‘सुखोई Su-35’ (Sukhoi Su-35 Flanker-E) फायटर जेट्स पुरवणार आहे. विशेष म्हणजे, यातील काही लढाऊ विमानांची निर्मिती पूर्ण होऊन ती डिलिव्हरीसाठी सज्ज झाली आहेत, तर उर्वरित विमानांचे काम रशियातील कारखान्यांमध्ये अतिशय वेगवान गतीने सुरू आहे. इराणकडे आधीच क्षेपणास्त्रांचा (Missiles) मोठा साठा उपलब्ध असून, आता या सुखोई विमानांमुळे त्यांची हवाई ताकद कैक पटींनी वाढणार आहे. रशियाचे हे पाऊल अमेरिका आणि इस्रायलच्या अडचणींमध्ये मोठी भर घालणारे ठरणार आहे.

डिफेन्स सिक्युरिटी एशियाने इराणी हवाई दलाच्या अत्यंत विश्वासू सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, २०२७ च्या सुरुवातीपर्यंत इराणसाठी एकूण ३० सुखोई Su-35 फायटर जेट्स पूर्णपणे तयार होतील अशी रशियाला अपेक्षा आहे. या अत्याधुनिक विमानांच्या समावेशामुळे इराणची शत्रूच्या हद्दीत खोलवर घुसून हल्ला करण्याची आणि अचूक हेरगिरी (Reconnaissance) करण्याची क्षमता कमालीची वाढणार आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, मार्च २०२६ पर्यंत १६ विमाने आधीच तयार करण्यात आली होती, तर एप्रिल महिन्यात आणखी एका विमानाची भर पडली. म्हणजेच सद्यस्थितीत तांत्रिकदृष्ट्या १७ फायटर जेट्सची एअरफ्रेम पूर्णपणे सज्ज आहे.

सुखोई डिझाईन ब्युरोने विकसित केलेले आणि कोम्सोमोलस्क-ऑन-अमूर एव्हिएशन प्लांटमध्ये तयार होणारे सुखोई Su-35 हे अत्यंत प्रगत, दोन इंजिन असलेले आणि ‘४.५ जनरेशन’चे (पिढीचे) एअर सुपीरियरिटी मल्टीरोल फायटर जेट आहे.

हे लढाऊ विमान तब्बल २४०० किमी प्रतितास (जवळपास २.२५ मॅक) या अवाढव्य वेगाने हवेत झेप घेऊ शकते. एकदा इंधन भरल्यानंतर सलग ३६०० किलोमीटरपर्यंतचा पल्ला गाठण्याची याची क्षमता आहे. या विमानातील सर्वात मोठी शक्ती म्हणजे यातील ‘इरबिस-ई’ (Irbis-E) हे अत्यंत शक्तीशाली रडार यंत्रणा होय, जे तब्बल ४०० किलोमीटर अंतरावरील शत्रूचे लक्ष्य अचूकपणे ट्रॅक करू शकते. तसेच या विमानात हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, अँटी-शिप (जहाजविरोधी) आणि अँटी-रेडिएशन क्षेपणास्त्रे सहज तैनात केली जाऊ शकतात. रशिया आणि इराणमधील हा वाढता लष्करी समन्वय आगामी काळात जागतिक राजकारणाला कोणती नवी कलाटणी देतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ