MSRTC News : एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारकडून महागाई भत्ता, घरभाडे आणि वार्षिक वेतनवाढीत घसघशीत वाढ

spot_img

परिवहन मंत्र्यांची पावसाळी अधिवेशनात मोठी घोषणा; सरकारी तिजोरीवर दरमहा ४५ कोटींचा अतिरिक्त भार पडणार असला तरी कर्मचाऱ्यांचे हित महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन.

राज्य विधिमंडळाच्या चालू पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत बोलताना एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये मोठी वाढ करण्याची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून विविध मागण्यांसाठी संघर्ष करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या वेतनात आता लक्षणीय वाढ होणार असून, संपूर्ण राज्यभरातून या निर्णयाचे जोरदार स्वागत केले जात आहे.

परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) थेट ५ टक्क्यांची वाढ करण्यात आली असून, तो आता ५३ टक्क्यांवरून ५८ टक्के झाला आहे. याशिवाय, कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्तादेखील (HRA) अनुक्रमे १०, २० आणि ३० टक्के असा सुधारित करण्यात आला आहे, जो पूर्वी ८, १६ आणि २४ टक्के इतका होता. कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक मोठी आनंदाची गोष्ट म्हणजे, त्यांची वार्षिक वेतनवाढ आता २ टक्क्यांऐवजी ३ टक्के दराने होणार आहे.

“या सर्व वेतन आणि भत्ता वाढीमुळे एसटी महामंडळावर दरमहा साधारण ४५ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे. मात्र, कर्मचाऱ्यांचे हक्क आणि त्यांच्या कल्याणापुढे हा आर्थिक भार आमच्यासाठी गौण आहे.” असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हंटल आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन कमी असल्यामुळे त्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो, असा सूर नेहमीच उमटत असतो. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आजवर अनेकदा आंदोलने, संप आणि मोर्च्यांचे हत्यार उपसून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता. वेतनवाढ आणि भत्त्यांमध्ये सुधारणा व्हावी ही त्यांची मुख्य मागणी होती. अखेर सरकारने या मागण्यांची दखल घेत कर्मचाऱ्यांच्या हिताचा हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याने लालपरीच्या कर्मचाऱ्यांमध्ये आता आनंदाचे वातावरण आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ