Crime News : गावठी कट्टे बाळगल्या प्रकरणी तिघांना अटक

spot_img

बेकायदेशीर रित्या दोन गावठी कट्टे तसेच जिवंत काडतूस

ओतूर,प्रतिनिधी:दि.२३ एप्रिल [ रमेश तांबे ]

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) जुन्नर तालुक्यातील नारायणगाव परिसरात शस्त्रास्त्रांची तस्करी करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई केली आहे. कारफाटा परिसरात बेकायदेशीररीत्या गावठी कट्टे बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी राहुल साळवे (साकोरी), दर्पण पवार आणि तेजस मातेले (दोघेही रा. नारायणगाव) या तरुणांना ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेचे पथक जुन्नर विभागात गस्त घालत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांना एका गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनंतर ही कारवाई अत्यंत गोपनीयरीत्या पार पडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल साळवे हा त्याच्या दोन साथीदारांसह एमएच ०६ बीई ४६२६ या इर्टिगा गाडीतून दोन गावठी कट्टे घेऊन कारफाटा परिसरात येणार होता. माहितीची खातरजमा होताच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसमक्ष या ठिकाणी सापळा लावला. संशयित गाडी येताच पोलिसांनी तिला अडवले आणि आरोपींची झडती घेतली. यावेळी राहुल साळवे आणि तेजस मातेले यांच्या कमरेला खोसलेले दोन गावठी कट्टे (पिस्तुल) आणि दोन जिवंत काडतुसे पोलिसांना सापडली. पोलिसांनी ही हत्यारे आणि वापरलेली इर्टिगा गाडी असा एकूण ५ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींनी हे कट्टे कोठून आणले आणि त्यांचा वापर कोणत्या गुन्ह्यासाठी केला जाणार होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल आणि अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव शेलार, प्रवीण सपांगे, दीपक साबळे, संदीप वारे आणि अक्षय नवले यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यात अशा प्रकारे शस्त्रे सापडल्याने खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ