spot_img

Bhimashankar Temple Nishikant Dubey : भीमाशंकर मंदिरातील व्हीआयपी दर्शनावरून वाद

spot_img

पुणे जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाणारे भीमाशंकर मंदिर सध्या दुरुस्तीच्या कामामुळे भाविकांसाठी बंद आहे. मंदिरातील सभामंडप आणि पायरी मार्गाच्या बांधकामासह सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी 9 जानेवारी 2026 पासून तीन महिन्यांसाठी मंदिरात सर्वसामान्यांना प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

या काळात भाविकांना मंदिरात जाऊन थेट दर्शन घेता येत नसल्याने अनेकांना निराश होऊन परत जावे लागत आहे. मात्र अशातच झारखंडमधील गोड्डा मतदारसंघाचे भाजप खासदार डॉ. निशिकांत दुबे यांना विशेष परवानगी देऊन मंदिरात व्हीआयपी दर्शन घडवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. ते हेलिकॉप्टरने भीमाशंकर येथे आल्याचेही सांगितले जात आहे.

या घटनेनंतर मंदिर प्रशासनावर भाविकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मंदिर सर्वसामान्यांसाठी बंद असताना राजकीय नेत्यांसाठी ते खुले का, असा सवाल उपस्थित होत आहे. महादेवाच्या मंदिरात असा दुजाभाव का केला जात आहे, असा प्रश्नही अनेक भक्त विचारत आहेत. दरम्यान, मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी भगवान भीमाशंकराची नित्य पूजा, अभिषेक आणि इतर धार्मिक विधी परंपरेप्रमाणे सुरूच आहेत. मात्र या कालावधीत भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश किंवा प्रत्यक्ष दर्शनाची परवानगी दिली जात नाही.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, बांधकाम कामगार, अधिकृत अधिकारी-कर्मचारी आणि भीमाशंकर गावातील स्थानिक नागरिक यांनाच सध्या मंदिर परिसरात प्रवेश दिला जात आहे. इतरांनी या निर्णयाचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

भीमाशंकर मंदिर पुण्याजवळील खेड तालुक्यात सह्याद्री पर्वतावर वसलेले आहे. बाराही ज्योतिर्लिंगांपैकी सहाव्या क्रमांकाचे हे शिवधाम मानले जाते. येथे असलेले शिवलिंग मोठ्या आकाराचे असल्यामुळे त्याला मोतेश्वर महादेव असेही संबोधले जाते. धार्मिक कथेनुसार, त्रेतायुगात भगवान शिव आणि त्रिपुरासूर यांच्यात झालेल्या युद्धानंतर निर्माण झालेल्या उष्णतेमुळे भीमा नदी आटली होती आणि नंतर भगवान शंकरांच्या घामातून ती पुन्हा प्रवाहित झाली, अशी आख्यायिका सांगितली जाते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ