इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशासह महाराष्ट्रात एलपीजी गॅसच्या पुरवठ्याबाबत अडचणी निर्माण होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे. या परिस्थितीचा परिणाम शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या व्यवस्थेवरही झाला आहे. दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येत असल्याने प्रसादाची मोठ्या प्रमाणावर तयारी केली जाते. मात्र सध्या उपलब्ध गॅस साठा मर्यादित असल्यामुळे संस्थानने प्रत्येक भाविकाला फक्त एक लाडूचे पाकीट देण्याचा निर्णय घेतला आहे.
संस्थानच्या माहितीनुसार, रोज साधारणपणे 45 हजार लाडू पाकीटांची विक्री केली जाते, तर दर्शन रांगेत सुमारे 50 हजार बुंदी पाकीटांचे मोफत वाटप केले जाते. गॅस टंचाईमुळे लाडू तयार करण्यासाठी लागणाऱ्या इंधनाचा वापर कमी करणे आवश्यक झाले असून यामुळे संस्थानला आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या संस्थानकडे लाडू तयार करण्यासाठी लागणारा गॅस फक्त दहा ते बारा दिवस पुरेल इतकाच शिल्लक असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे गॅसचा वापर मर्यादित ठेवण्यासाठी आणि उपलब्ध साठा जपून वापरण्यासाठी भाविकांना एकच लाडू पाकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गॅस टंचाईचा परिणाम प्रसादालयातील भोजन व्यवस्थेवरही झाला आहे. यापुढे भाविकांना प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या मेनूमध्ये बदल करण्यात आला आहे. दोन भाज्यांऐवजी एकच भाजी दिली जाणार असून डाळ-भाताऐवजी तांदळाची खिचडी दिली जाणार आहे. त्यामुळे आता भाविकांना चपाती, एक भाजी आणि खिचडी असे साधे भोजन मिळणार आहे.
दरम्यान, गॅसचा वापर कमी करण्यासाठी साई संस्थान सौरऊर्जेच्या प्रकल्पाचा अधिकाधिक वापर करत आहे. प्रसाद आणि भोजन तयार करताना सोलर प्लांटचा आधार घेत गॅसची बचत करण्याचा प्रयत्न संस्थानकडून केला जात आहे.




