spot_img

Murlidhar Mohol Pune : २९ वर्षांपूर्वीच्या जुन्या जखमेने डोकं वर काढलं, मुरलीधर मोहोळ यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

spot_img

कुस्तीच्या आखाड्यातील ‘ती’ दुखापत बळावली; ‘जनसेवेत खंड पडतोय’ म्हणत पुण्याचे खासदार झाले भावूक

पुण्याचे लाडके खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया कोणत्याही ताज्या जखमेसाठी नसून, तब्बल २९ वर्षांपूर्वी कुस्तीच्या आखाड्यात झालेल्या एका गंभीर दुखापतीमुळे करावी लागली आहे. कोल्हापूर येथे कुस्ती खेळत असताना मोहोळ यांच्या गुडघ्याला मोठी इजा झाली होती, ज्यामुळं त्यांचं कुस्तीगीर होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं होतं. गेली अनेक वर्षे या त्रासाकडे दुर्लक्ष केल्यानंतर, अलीकडच्या सततच्या धावपळीमुळे आणि प्रवासामुळे ही जुनी दुखापत पुन्हा उफाळून आली, परिणामी डॉक्टरांनी त्यांना तातडीने शस्त्रक्रियेचा सल्ला दिला.

शस्त्रक्रियेनंतर मोहोळ यांना डॉक्टरांनी किमान एक महिना पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले आहे. सद्यस्थितीत संसदेचे अधिवेशन सुरू असून, मतदारसंघात अनेक महत्त्वाची कामे आणि आगामी ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे नियोजन समोर आहे. अशा महत्त्वाच्या काळात कामापासून लांब राहावे लागत असल्याबद्दल त्यांनी सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त केल्या. “शारीरिक वेदनांपेक्षा जनसेवेच्या कामात पडणाऱ्या खंडामुळे मला जास्त त्रास होत आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपली खंत बोलून दाखवली.

मुरलीधर मोहोळ सध्या आठवडाभर डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णालयातच राहणार असून, त्यानंतर ते घरी परततील. “तुमच्या आशीर्वादामुळे मी लवकरच बरा होऊन महिनाभरात पुन्हा एकदा पहिल्यापेक्षा जास्त जोमाने जनतेच्या सेवेसाठी सज्ज होईन,” असा विश्वास त्यांनी आपल्या चाहत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिला आहे. दरम्यान, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांकडून त्यांच्या प्रकृतीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ