सिकंदर रजाच्या 13 वर्षीय भावाचा दुर्दैवी मृत्यू.
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा टी-20 कर्णधार सिकंदर रजा यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रजा यांचा धाकटा भाऊ मोहम्मद महदीचे वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी निधन झाले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे केवळ झिम्बाब्वे क्रिकेटच नव्हे, तर संपूर्ण क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने (ZC) अधिकृत निवेदन जारी करत या दुःखद बातमीला दुजोरा दिला आहे. बोर्डाने सांगितले की, मोहम्मद महदीचे 29 डिसेंबर 2025 रोजी हरारे येथे निधन झाले. तो जन्मापासूनच ‘हिमोफिलिया’ या गंभीर आजाराने ग्रस्त होता. अलीकडे प्रकृती अधिक बिघडल्याने त्याची प्राणज्योत मालवली. 30 डिसेंबर रोजी हरारेतील वॉरेन हिल्स स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने आपल्या निवेदनात म्हटले आहे, “झिम्बाब्वे क्रिकेट, आपल्या टी-20 कर्णधार सिकंदर रजा आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती मनापासून शोक व्यक्त करत आहे. या कठीण काळात बोर्ड, खेळाडू आणि संपूर्ण स्टाफ रजा कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. ईश्वराने कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची ताकद द्यावी आणि मोहम्मद महदीच्या आत्म्यास शांती लाभो, हीच प्रार्थना.”या दुःखद घटनेनंतर सिकंदर रजानीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भावना व्यक्त केली. त्यानी झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाचे निवेदन शेअर करत तुटलेल्या हृदयाचा इमोजी पोस्ट केला, जो त्यांच्या वेदना स्पष्टपणे दर्शवत होता. क्रिकेट चाहते तसेच सहकारी खेळाडू रजाना सातत्याने धीर देत आहेत.




