पालकमंत्री शंभूराज देसाई झटापटीत जखमी; विधान परिषदेत नीलम गोऱ्हे आणि जयकुमार गोरे यांच्यात खडाजंगी
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोमवारी (२३ मार्च) झालेला राडा आता राज्याच्या विधीमंडळापर्यंत पोहोचला असून, याचे पडसाद विधान परिषदेत उमटले आहेत. या हिंसक झटापटीची गंभीर दखल घेत विधान परिषद सभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांना (SP) तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश पुणे विभागीय आयुक्तांना देण्यात आले असून, सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यास सांगितले आहे. निवडणुकीदरम्यान पालकमंत्री शंभूराज देसाई आणि कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील यांना आपल्याच सदस्यांना सभागृहात नेण्यासाठी पोलिसांशी संघर्ष करावा लागला, ज्यामध्ये शंभूराज देसाई जखमी झाले.
मात्र, या निलंबनाच्या निर्णयावरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सभापतींच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला. “कोणतीही वस्तुस्थिती जाणून न घेता एका आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यावर अशी कारवाई करणे चुकीचे आहे,” असे म्हणत गोरे यांनी सभापतींच्या आदेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जिल्हा परिषदेत ४ हजार लोक नेमके कोणाच्या सांगण्यावरून शिरले आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न कोणी निर्माण केला, याचे उत्तर मिळणे गरजेचे असल्याचे गोरे यांनी ठणकावून सांगितले. दुसरीकडे, शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीचीही मागणी केली असून, मंत्र्यांना होणारी मारहाण ही लोकशाहीसाठी दुर्दैवी असल्याची टीका केली आहे.




