“चित्रपटात बॉम्ब फुटले ल्यारीमध्ये, पण धूर निघाला वांद्रे-जुहूत”; ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स’मध्ये झाकीरने आरसा दाखवताच सेलिब्रिटींच्या चेहऱ्यावरचे उडाले हसू
सध्या बॉक्स ऑफिसवर एकाच नावाचा डंका ऐकू येतोय, तो म्हणजे आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला ‘धुरंधर : द रिव्हेंज’. प्रदर्शनाच्या अवघ्या १८ दिवसांत या चित्रपटाने १००० कोटींचा आकडा पार करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मात्र, एकीकडे हा चित्रपट यशाची शिखरे सर करत असताना, दुसरीकडे इंडस्ट्रीतील अंतर्गत हेवेदावेही चव्हाट्यावर आले आहेत. प्रसिद्ध कॉमेडियन झाकीर खान याने नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात यावरून बॉलिवूडमधील अनेक बड्या हस्तींना उघडे पाडले आहे.
‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६’ च्या व्यासपीठावर सूत्रसंचालन करताना झाकीरने आपल्या खास उपरोधिक शैलीत बॉलिवूडच्या ‘दिखाव्या’वर निशाणा साधला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये झाकीर म्हणतो की, “तुम्ही कितीही कौतुकाच्या पोस्ट करा किंवा मुलाखतीत हा माझा आवडता चित्रपट आहे असं सांगा, पण खरं हेच आहे की ‘धुरंधर’च्या यशाने सर्वांचीच जळाली आहे.” त्याने पुढे मारलेला टोला सध्या सोशल मीडियावर तुफान गाजतोय. झाकीर म्हणाला, “चित्रपटात ल्यारीमध्ये बॉम्ब फुटले आहेत, पण त्याचा धूर वांद्र्यापासून जुहूपर्यंत (बॉलिवूडच्या गडापर्यंत) पोहोचला आहे.”
झाकीरच्या या विधानानंतर प्रेक्षकांमध्ये एकच चर्चा रंगली आहे. काहींच्या मते त्याने इंडस्ट्रीतील ‘दांभिकपणा’वर अचूक बोट ठेवले आहे, तर काही नेटकऱ्यांनी “सत्य बोलण्यासाठी हिंमत लागते” अशा शब्दांत झाकीरचे कौतुक केले आहे. एकीकडे चित्रपट ‘प्रोपगेंडा’ असल्याच्या चर्चा सुरू असताना, झाकीर खानने मात्र या यशाने अनेकांच्या पोटात गोळा आल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यामुळे ‘धुरंधर २’ च्या यशासोबतच आता इंडस्ट्रीतील हे ‘कोल्ड वॉर’ अधिक चर्चेत आले आहे.




