RCB थेट फायनलमध्ये; दिल्ली सलग चौथ्यांदा अंतिम फेरी गाठणार की गुजरात जायंट्स इतिहास रचणार?
वूमन्स प्रीमियर लीग 2026 चा चौथा मोसम आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दमदार कामगिरी करत थेट अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष एलिमिनेटर सामन्याकडे लागले असून, अंतिम फेरीत RCBला भिडणारा दुसरा संघ कोणता असेल, हे मंगळवारी 3 फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे.
एलिमिनेटर सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitlas) आणि गुजरात जायंट्स (Gujrat Jaints) हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात जो संघ विजय मिळवेल, तो थेट अंतिम फेरीत पोहोचेल, तर पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येईल.
दिल्ली कॅपिट्ल्सने आतापर्यंत WPL च्या इतिहासात सातत्यपूर्ण कामगिरी करत सलग तीन वेळा अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे दिल्लीचा संघ चौथ्यांदा फायनलमध्ये धडक मारणार का, की गुजरात जायंट्स हा दिल्लीचा विजयरथ रोखणार, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
एलिमिनेटर सामना कधी आणि कुठे?
दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध गुजरात जायंट्स हा एलिमिनेटर सामना मंगळवारी, 3 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना बडोदा येथील कोतांबी परिसरातील बीसीए स्टेडियमवर होणार आहे.
सामन्याची वेळ:
- टॉस: संध्याकाळी 7.00 वाजता
- सामना सुरू: संध्याकाळी 7.30 वाजता लाईव्ह सामना कुठे पाहाल?
हा एलिमिनेटर सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील विविध चॅनेल्सवर थेट प्रक्षेपित केला जाणार आहे. तर मोबाईल आणि डिजिटल प्रेक्षकांसाठी जिओहॉटस्टार अॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
गुजरात–दिल्ली आमनेसामने: तिसरा सामना
या मोसमात गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यातील ही तिसरी लढत ठरणार आहे. विशेष बाब म्हणजे, याआधी झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये गुजरातने दिल्लीवर अत्यंत अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला आहे.
- 11 जानेवारी: गुजरातने दिल्लीवर अवघ्या 4 धावांनी मात केली
- 27 जानेवारी: पुन्हा एकदा 3 धावांनी गुजरातचा निसटता विजय
आता एलिमिनेटरमध्ये दिल्ली हा पराभवांचा बदला घेणार का, की गुजरात जायंट्स पुन्हा एकदा दिल्लीसाठी अडसर ठरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.




