spot_img

WPL 2026 Final : चौथ्यांदा फायनलमध्ये दिल्ली कॅपिट्ल्स, यंदा तरी ट्रॉफीची प्रतिक्षा संपणार का?

spot_img

जेमिमाह रॉड्रिग्सच्या नेतृत्वात दिल्लीसमोर इतिहास बदलण्याची संधी; अंतिम फेरीत आरसीबीचं कडवं आव्हान

वूमन्स प्रीमियर लीगच्या इतिहासात दिल्ली कॅपिट्ल्सने पुन्हा एकदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. विशेष बाब म्हणजे ही दिल्लीची एकूण आणि सलग चौथी फायनल आहे. मात्र, याआधीच्या तीनही हंगामांत दिल्लीला विजेतेपद मिळवता आलेलं नाही. त्यामुळे यंदा चौथ्या प्रयत्नात तरी ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी दिल्लीकडे चालून आली आहे.

या मोसमात जेमिमाह रॉड्रिग्सने पहिल्यांदाच दिल्ली कॅपिट्ल्सचं नेतृत्व स्वीकारलं आणि पहिल्याच प्रयत्नात संघाला अंतिम फेरीपर्यंत नेलं. आता तिच्यासमोर मोठं आव्हान आहे—दिल्लीला पहिल्यांदा वूमन्स प्रीमियर लीगचं विजेतेपद मिळवून देण्याचं. दिल्लीच्या चाहत्यांना यंदा प्रतिक्षेचा शेवट होईल, अशी आशा आहे.

अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्ससमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं (RCB) आव्हान असणार आहे. हा सामना गुरुवारी, ५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७.३० वाजता खेळवला जाणार असून टॉस ७ वाजता होईल. दिल्लीची कमान जेमिमाह रॉड्रिग्सकडे असेल, तर आरसीबीचं नेतृत्व स्मृती मंधानाकडे आहे.

या मोसमात आरसीबीने दमदार कामगिरी करत सलग पहिल्या पाच सामन्यांत विजय मिळवला आणि गुणतालिकेत अव्वल स्थान राखत थेट अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे, दिल्लीने साखळी फेरीत अटीतटीच्या लढतीत यूपी वॉरियर्सवर मात करत प्लेऑफचं तिकीट मिळवलं. त्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी झालेल्या एलिमिनेटर सामन्यात दिल्लीने गुजरातचा पराभव करून फायनल गाठली.

दिल्ली कॅपिट्ल्ससाठी अंतिम फेरी कायमच आव्हानात्मक ठरली आहे. तीन वेळा ट्रॉफी अगदी जवळ येऊनही हुलकावणी देऊन गेली आहे. त्यामुळे यंदा तरी दिल्लीचा चॅम्पियन होण्याचा दुष्काळ संपणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.

दरम्यान, या मोसमात दिल्ली आणि आरसीबी साखळी फेरीत दोनदा आमनेसामने आले आहेत. १७ जानेवारीला झालेल्या पहिल्या सामन्यात आरसीबीने दिल्लीवर ८ विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला होता. मात्र २४ जानेवारीला झालेल्या दुसऱ्या सामन्यात दिल्लीने जोरदार पुनरागमन करत आरसीबीला ७ विकेट्सने पराभूत करत पराभवाची परतफेड केली.

आता अंतिम सामन्याच्या निमित्ताने या दोन्ही बलाढ्य संघांची या मोसमातील तिसरी आणि निर्णायक लढत रंगणार आहे. दिल्ली चौथ्यांदा नशीब आजमावणार की आरसीबी आपली वर्चस्वाची मोहीम कायम ठेवणार—याचं उत्तर फायनलच्या निकालातूनच मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ