एक काळ होता, जेव्हा घराचा दिवाणखाना अर्थात लिविंग रूम एका विशिष्ट दिशेने वळलेला असायचा. त्या दिशेला, एका विशिष्ट कोपऱ्यात, एक काळ्या रंगाची किंवा लाकडी पेटी विराजमान असायची. घरातल्या सगळ्या व्यक्ती संध्याकाळी, रात्री किंवा रविवारी अगदी सकाळी त्या पेटीसमोर अगदी शांतपणे, भक्तीभावाने जमत असत. कुटुंबातील सदस्य, शेजारी, आणि मित्रमंडळी सारेच त्या पेटीतील चित्रे आणि आवाजाच्या जादुई दुनियेत हरवून जात असत. ती नुसती पेटी नव्हती, तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय बदलांचा तो केंद्रबिंदू होता. ही जादुई पेटी म्हणजेच ‘दूरदर्शन’ किंवा ‘टेलिव्हिजन’. याच दूरदर्शनच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी 21 नोव्हेंबर हा दिवस जागतिक दूरदर्शन दिन (World Television Day) म्हणून साजरा केला जातो. आज जेव्हा जग मोबाईलच्या स्क्रीनमध्ये मावले आहे, हातातल्या सहा इंची डिस्प्लेने मनोरंजन, माहिती आणि शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे, तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की आज टीव्हीचे स्थान काय आहे? तो केवळ घरातील एक शोभेची वस्तू बनून राहिला आहे की त्याचे महत्त्व आजही टिकून आहे? आज या विशेष दिनाच्या निमित्ताने, टीव्हीच्या निर्माणापासून ते त्याच्या सुवर्णकाळापर्यंत आणि मोबाईलमुळे आलेल्या त्याच्या ‘अस्ता’च्या पर्यंतचा हा मोठा प्रवास सविस्तरपणे पाहूया.
जागतिक दूरदर्शन दिनाची सुरुवात 1996 मध्ये झाली. याच वर्षी 21 नोव्हेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्यावतीने पहिला जागतिक दूरदर्शन मंच अर्थात First World Television Forum आयोजित करण्यात आला होता. या मंचावर जगातील प्रमुख प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, पत्रकार आणि सरकारी अधिकारी एकत्र आले होते. त्यांनी जगातील निर्णय प्रक्रिया, जागतिक समस्या आणि शांतता व सुरक्षेवर दूरदर्शनचा वाढत असलेला प्रभाव यावर गंभीर चर्चा केली. या चर्चेनंतर, दूरदर्शनची सामाजिक आणि राजकीय भूमिका ओळखून, संयुक्त राष्ट्रांच्या UN General Assembly ने डिसेंबर 1996 मध्ये एक ठराव मंजूर केला आणि 21 नोव्हेंबर हा दिवस जागतिक दूरदर्शन दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.
हा दिवस फक्त मनोरंजनाच्या एका साधनाचे कौतुक करण्यासाठी नाही, तर त्याचे सामाजिक आणि जागतिक स्तरावरचे योगदान अधोरेखित करण्यासाठी आहे. दूरदर्शनने जगातील संघर्ष, मानवाधिकार उल्लंघन, पर्यावरण समस्या आणि शांततेसमोरील धोके लोकांसमोर आणले. दूर-दूरच्या घटना थेट लोकांच्या दिवाणखान्यापर्यंत पोहोचवल्या, ज्यामुळे जागतिक जागरूकता वाढली आणि सामूहिक कृतीला प्रोत्साहन मिळाले. टीव्हीमुळे राजकारण आणि सामाजिक समस्या अधिक पारदर्शक झाल्या. टीव्हीवरील चर्चा आणि वादविवाद मतदारांना आणि धोरणकर्त्यांना निर्णय घेण्यासाठी आवश्यक माहिती पुरवतात. दूरदर्शन हे शिक्षण आणि विकासासाठी एक प्रभावी माध्यम म्हणून उदयास आले. विशेषत: विकसनशील देशांमध्ये, जिथे साक्षरता कमी होती, तिथे दृकश्राव्य (Audio-Visual) माध्यमातून शिक्षण देणे शक्य झाले. टीव्हीने सीमा ओलांडून संस्कृती, भाषा आणि जीवनशैली एकमेकांच्या जवळ आणल्या. यामुळे एका अर्थाने टीव्ही जागतिकीकरणाचे एक महत्त्वाचे प्रतीक बनला. हा दिवस साजरा करताना, संयुक्त राष्ट्रांनी टीव्हीचा वापर शांतता, सुरक्षा, आर्थिक विकास आणि सामाजिक समस्यांवर सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यासाठी कसा करावा, यावर लक्ष केंद्रित केले.
कोणत्याही महान शोधाप्रमाणे, दूरदर्शनचा प्रवासही दीर्घ आणि अनेक शोधांच्या टप्प्यांनी पूर्ण झाला आहे. 1872 मध्ये सेलेनियम नावाच्या धातूने प्रकाशाच्या संपर्कात आल्यावर विद्युत वाहकतेत बदल होतो, हा शोध लागल्यापासून या प्रवासाला सुरुवात झाली. पण दूरदर्शनची खरी कथा दोन प्रमुख टप्प्यांमध्ये विभागली जाते, एक यांत्रिकी अर्थात Mechanical आणि दुसरा इलेक्ट्रॉनिक.
जर्मन शास्त्रज्ञ पॉल निप्कोव यांनी ‘निप्कोव डिस्क’चा शोध लावला. ही एक फिरणारी डिस्क होती, ज्यामध्ये गोलाकार छिद्रे होती. या डिस्कचा उपयोग चित्रे एका वेळी एका ओळीत स्कॅन करण्यासाठी केला गेला. यालाच त्यांनी ‘इलेक्ट्रिक टेलिस्कोप’ म्हटले. हाच यांत्रिकी दूरदर्शनचा पाया होता. पुढे जाऊन स्कॉटिश संशोधक जॉन लोगी बेअर्ड यांनी यांत्रिकी टीव्हीला मूर्त स्वरूप दिले. 1925 मध्ये, त्यांनी लंडनमध्ये पहिल्यांदा चलचित्रांचे सार्वजनिक प्रदर्शन केले. या दृश्यांमध्ये अस्पष्ट आणि कमी रिझोल्यूशनची चित्रे दिसत होती, पण हा एक क्रांतीकारक टप्पा होता. बेअर्ड यांनी पुढे जाऊन रंगीत टीव्ही आणि थ्रीडी टीव्हीचेही प्राथमिक प्रयोग केले.
यांत्रिकी टीव्हीमध्ये चित्राची गुणवत्ता कमी आणि फ्रिक्वेन्सी मर्यादा असल्याने इलेक्ट्रॉनिक टीव्हीचा शोध आवश्यक होता. अमेरिकेतील फक्त 21 वर्षांच्या फिलो फार्न्सवर्थ यांनी 7 सप्टेंबर 1927 रोजी जगातील पहिले पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक टीव्ही प्रणालीचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यांनी ‘इमेज डिसेक्टर’ नावाच्या कॅमेरा ट्यूबचा वापर केला, ज्याने प्रकाशाला इलेक्ट्रॉनिक सिग्नलमध्ये रूपांतरित केले. बेअर्डचे यांत्रिकी टीव्हीचे युग संपुष्टात आणून, फार्न्सवर्थ यांनी आधुनिक टीव्हीचा पाया रोवला. रशियन वंशाचे अमेरिकन शास्त्रज्ञ व्लादिमिर झ्वोरायकीन यांनी RCA साठी ‘आयकोनोस्कोप’ नावाच्या कॅमेरा ट्यूबवर काम केले. यामुळे इलेक्ट्रॉनिक टीव्ही तंत्रज्ञान अधिक मजबूत झाले. 1930 च्या दशकाच्या उत्तरार्धात युरोप आणि अमेरिकेत नियमित व्यावसायिक प्रसारण सुरू झाले. 1939 मध्ये न्यूयॉर्कमधील वर्ल्ड्स फेअरमध्ये RCA पहिले व्यावसायिक टीव्ही सेट विक्रीसाठी आणले.
1950 च्या दशकात रंगीत टीव्हीचे तंत्रज्ञान विकसित झाले, पण जुन्या ब्लॅक अँड व्हाईट सेटशी सुसंगतता नसल्याने सुरुवातीला त्याचा विरोध झाला. अखेरीस, अमेरिकेने 1953 मध्ये NTSC मानके स्वीकारून रंगीत टीव्हीची मोठी लाट आणली. या संपूर्ण प्रवासातून, दूरदर्शन मनोरंजन, माहिती आणि शिक्षणाचे सर्वात प्रभावी माध्यम बनले. दूरदर्शनने भारतात प्रवेश करणे म्हणजे केवळ एक नवीन तंत्रज्ञान स्वीकारणे नव्हते, तर राष्ट्रीय एकात्मता आणि विकासाच्या एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात होती. भारतात दूरदर्शनची सुरुवात 15 सप्टेंबर 1959 रोजी झाली. ही सेवा दिल्लीत एका प्रायोगिक प्रकल्पाच्या रूपात सुरू झाली. आकाशवाणी भवन, नवी दिल्ली येथील तात्पुरत्या स्टुडिओतून पहिले प्रक्षेपण झाले. सुरुवातीला, आठवड्यातून फक्त दोनदा, एक तासासाठी, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित केले जात. याचा उद्देश मनोरंजन नव्हता, तर ग्रामीण आणि शहरी लोकांना सामाजिक शिक्षण देणे हा होता. विशेष म्हणजे, मराठी साहित्यातील नामचिन व्यक्तिमत्त्व, पु. ल. देशपांडे हे दूरदर्शनचे पहिले संचालक होते. ‘टेलिव्हिजन’ या शब्दासाठी त्यांनीच ‘दूरचे दर्शन’ या अर्थाचा ‘दूरदर्शन’ हा मराठी शब्द सुचवला, जो नंतर सर्वमान्य झाला.
प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेली ही सेवा 15 ऑगस्ट 1965 पासून दैनंदिन स्वरूपात सुरू झाली. याच दिवशी हिंदीमध्ये पहिले नियमित NEWS Bulletin प्रसारित झाले. 1972 पर्यंत दूरदर्शन सेवा केवळ दिल्लीपुरती मर्यादित होती. 2 ऑक्टोबर 1972 रोजी मुंबईमध्ये दुसरे केंद्र सुरू झाले आणि त्यानंतर अमृतसर, श्रीनगर, चेन्नई, आणि लखनऊ यांसारख्या शहरांमध्ये त्याचा विस्तार झाला. सॅटेलाईट इंस्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट अर्थात SITE हा जगातील सर्वात मोठा सामाजिक शिक्षण उपक्रम म्हणून 1975-76 मध्ये राबवण्यात आला. अमेरिकेच्या नासा उपग्रहाच्या मदतीने भारतातील 6 राज्यांमधील सुमारे 2400 खेड्यांमध्ये थेट शैक्षणिक आणि कृषीविषयक कार्यक्रम प्रसारित झाले. हा प्रयोग दूरदर्शनच्या सामाजिक विकासाचा उद्देश सिद्ध करणारा ठरला.
1 एप्रिल 1976 रोजी दूरदर्शनला ‘ऑल इंडिया रेडिओ’ (आकाशवाणी) पासून वेगळे करण्यात आले आणि त्याला स्वतंत्र ‘दूरदर्शन’ या नावाने ओळख मिळाली. 1982 मध्ये दिल्लीत आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धा (Asian Games) ही भारतातील दूरदर्शनच्या इतिहासाची कलाटणी ठरली. या स्पर्धांचे थेट प्रसारण रंगीत स्वरूपात करण्याची ऐतिहासिक घोषणा सरकारने केली. या निर्णयामुळे देशात रंगीत टीव्हीची मागणी वाढली आणि टीव्ही खऱ्या अर्थाने घरोघरी पोहोचू लागला. याच काळात राष्ट्रीय स्तरावर एकच वाहिनी (DD National) देशभरात प्रसारित होऊ लागली. दूरदर्शनचे जाळे उपग्रहांमार्फत संपूर्ण देशभर पसरले. 1976 पासून व्यावसायिक जाहिरातींना सुरुवात झाली असली तरी, 1980 च्या दशकात रंगीत प्रसारणामुळे जाहिरातदारांचा ओघ वाढला, ज्यामुळे दूरदर्शनला आर्थिक बळ मिळाले.
1980 च्या दशकापासून ते 2000 च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंतचा काळ हा भारतीय दूरदर्शनचा सुवर्णकाळ होता. या काळात टीव्हीने केवळ मनोरंजन केले नाही, तर भारतीय कुटुंब आणि समाजाला एकत्र आणण्याचे ऐतिहासिक कार्य केले ‘दूरदर्शन’ हे भारतातील भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेने भरलेल्या देशाला एकाच धाग्यात बांधणारे सर्वात मोठे माध्यम ठरले. दिल्लीहून प्रसारित होणारे राष्ट्रीय कार्यक्रम काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एकाच वेळी पाहिले जात. कृषी, आरोग्य, कुटुंब नियोजन, आणि विज्ञान यांसारख्या विषयांवरील माहितीपूर्ण कार्यक्रम उदा. कृषी दर्शन, विज्ञान वार्ता हे थेट शेतकऱ्यांपर्यंत आणि सामान्य जनतेपर्यंत पोहचू लागले.निवडणूक वार्तापत्रे, सरकारी योजनांची माहिती आणि राजकीय नेत्यांचे संवाद जनतेपर्यंत पोहोचवून टीव्हीने लोकशाही प्रक्रियेत जागरूकता आणली.
80 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 90 च्या दशकात रामानंद सागर यांचे ‘रामायण’ आणि बी. आर. चोप्रा यांचे ‘महाभारत’ प्रसारित झाले. रविवारची सकाळ म्हणजे जणू राष्ट्रीय सण. या मालिकांच्या वेळी रस्त्यावर अक्षरशः शुकशुकाट असायचा. या मालिकांना घेऊन त्यांच्यावर आरोपही झाले की याच मालिकांमुळे देशात धार्मिक तेढ निर्माण झाला. संघ परिवारासाठी पोषक वातावरण तयार झाले, ज्याचा फायदा घेत समाजद्रोही घटकांनी बाबरी मशीद पडून देशभर दंगली उसळल्या. याचा थेट फायदा निवडणुकीत भाजपला मिळाला असला तरी या धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात काँग्रेसच्या काळातच सुरू झाल्याने काँग्रेसदेखील भाजपला मदत केल्याचे आरोप झाले, ते आजही कायम आहेत.
संध्याकाळच्या बातम्या (हिंदी/इंग्रजी बुलेटिन) सुरू झाल्यावर संपूर्ण घरामध्ये शांतता पसरत असे. अनंत भावे, शम्मी नारंग, प्रदीप भिडे आणि अविनाश कौर सरीन यांच्या आत्मविश्वासाने परिपूर्ण बातम्यांच्या निवेदनाने लोक भारावून जात. बातम्या संपल्यावर त्यावरील चर्चा जेवणाच्या टेबलावर रंगायच्या, ज्यामुळे कुटुंबात माहिती आणि ज्ञानाची देवाणघेवाण व्हायची. माहिती आणि ज्ञानासोबतच मनोरंजन क्षेत्रात देखील दूरदर्शनचे महत्त्व होते. हम लोग ही भारताची पहिली मालिका 1984 ला सुरू झाली. सामाजिक समस्यांवर आधारित या मालिकेतील बड्की, बसंसेर, आणि मझली ही पात्रे घरातील सदस्य बनली होती. त्यानंतर देख भाई देख आणि हम पांच यांसारख्या सिटकॉम्सनी कुटुंबाला निखळ हास्य दिले. या मालिकांमुळे कुटुंबातील ताण हलका होऊन, सर्व पिढ्यांचे सदस्य एकत्र हसण्याचा आणि कार्यक्रमांवर चर्चा करण्याचा आनंद घेत होते. यांशिवाय बुनियाद, नुक्कड, रजनी, व्योमकेश बक्षी यांसारख्या मालिकांनी भारतीय समाजाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आणि लोकांना विचार करण्यास प्रवृत्त केले.
मनोरंजन आणि कुटुंबाला एकत्र आणण्यापलीकडे, टीव्हीने भारताच्या आधुनिक प्रवासात मोलाची भूमिका बजावली आहे. दूरदर्शनवरील शालेय शिक्षण कार्यक्रम (School TV), इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कार्यक्रम आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे व्याख्याने दूरवरच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे साधन बनले. शास्त्रीय संगीत, नृत्य, नाटक आणि विविध प्रादेशिक कला प्रकारांना टीव्हीच्या निमित्ताने एकराष्ट्रीय मंच मिळाला. एवढेच नव्हे तर नैसर्गिक आपत्ती किंवा राष्ट्रीय संकटांच्या वेळी माहितीचा मुख्य आणि विश्वसनीय स्रोत म्हणून दूरदर्शनकडे पाहिले जात होते. 1990 नंतरच्या खाजगी वाहिन्यांच्या आगमनाने भारतीय लोकांना जागतिक मनोरंजन, संस्कृती आणि जीवनशैलीशी जोडले. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. 21 व्या शतकाच्या दुसऱ्या दशकात, विशेषत: 2016 नंतर, भारतात झालेल्या इंटरनेट क्रांतीने प्रामुख्याने स्वस्त डेटा आणि स्मार्टफोनच्या वाढलेल्या वापराने पारंपरिक टीव्हीच्या स्थानावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
टीव्हीचे पारंपरिक मॉडेल Scheduled होते. म्हणजे, कार्यक्रम विशिष्ट वेळेवर पाहण्याची सक्ती होती. तुम्ही बातम्या चुकवल्या, तर त्या दुसऱ्या दिवशी पाहाव्या लागायच्या. पण ओटीटी Netflix, Amazon Prime Video, JioHotstar इत्यादींसारख्या Over-The-Top प्लॅटफॉर्म्सच्या आगमनाने हे समीकरण पूर्णपणे बदलले. ओटीटीने लोकांना ‘जेव्हा पाहिजे, जिथे पाहिजे आणि जितके पाहिजे, तितके पाहण्याचे’ स्वातंत्र्य दिले. कुटुंबाने एकत्र पाहण्याची सक्ती संपली. आता कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापल्या हातातल्या स्क्रीनवर, आपापल्या वेळेनुसार, आपापल्या आवडीचा कार्यक्रम पाहू लागला. पूर्वी टीव्ही ही सामूहिक स्क्रीन होती, आता मोबाईल ही व्यक्तिगत स्क्रीन झाली आहे. आई किचनमध्ये सीरियल पाहते, वडील दिवाणखान्यात बातम्या पाहतात आणि मुले त्यांच्या बेडरूममध्ये वेब सिरीज पाहतात किंवा गेम खेळतात. बातम्या आणि माहितीसाठी आता लोक टीव्ही चॅनलपेक्षा सोशल मीडिया, युट्यूब चॅनेल्स आणि त्वरित अपडेट देणाऱ्या ॲप्सचा वापर करतात. टीव्हीवरील ‘ब्रेकिंग न्यूज’ मोबाईलवर काही सेकंदांपूर्वीच वाचायला/बघायला मिळालेली असते, त्यामुळे टीव्हीची तशी गरज संपली आहे असे वाटते.
आज मोबाईलच्या काळात, पारंपरिक टीव्ही अनेक घरांमध्ये कालबाह्य झाला आहे किंवा त्याचे स्वरूप बदलून तो केवळ ‘शोभेची वस्तू’ (A decorative piece or a smart display) बनला आहे. टीव्ही आता त्या लाकडी पेटीसारखा ‘देव्हारा’ राहिलेला नाही, ज्याभोवती सर्वजण जमायचे. तो घराच्या इंटिरियर डिझाइनचा एक भाग बनला आहे, एक मोठी, पातळ स्क्रीन, जी भिंतीवर सुंदर दिसते. यातून टीव्हीचा मृत्यू झाला आहे, असे म्हणणे पूर्णपणे बरोबर नाही, पण ‘टेलिव्हिजन’, ज्या अर्थाने आपण त्याला ओळखत होतो, त्या माध्यमाचे रूपांतर झाले आहे. आजचा टीव्ही सेट केवळ एक मोठी स्क्रीन आहे, ज्यावर तुम्ही मोबाईल किंवा इंटरनेटवरून ‘कास्ट’ केलेले चित्रपट किंवा ओटीटी ॲप्स पाहता. टीव्हीचे खरे माध्यम जसे की केबल/डिश टीव्ही हे बाजूला पडून, इंटरनेट हेच त्याचे मुख्य स्त्रोत बनले आहे.
टीव्ही कालबाह्य झाला असला तरी, मोठ्या स्क्रीनचे आकर्षण आजही कायम आहे. क्रिकेट, फुटबॉल विश्वचषक किंवा ऑलिम्पिक यांसारखे मोठे क्रीडा इव्हेंट्स आजही कुटुंबातील किंवा मित्र एकत्र येऊन मोठ्या स्क्रीनवर पाहतात. चित्रपट, विशेषत: अॅक्शन किंवा थ्रीडी इफेक्ट्स असलेले चित्रपट पाहण्यासाठी आजही लोक मोठ्या आणि चांगला साउंड सिस्टीम असलेल्या टीव्हीलाच प्राधान्य देतात. आताचा टीव्ही केवळ सिग्नल घेणारा नाही, तर स्वतः एक कॉम्प्युटर (Smart TV) बनला आहे. यामुळे तो अजूनही दिवाणखान्याचा सर्वात मोठा आणि उत्कृष्ट डिस्प्ले म्हणून टिकून आहे.
दूरदर्शनचा प्रवास एका यांत्रिकी चमत्कारापासून सुरू झाला, त्याने दोन दशकांपेक्षा जास्त काळ भारतीय कुटुंबांना एकत्र ठेवले, राष्ट्रीय एकोपा साधला, आणि प्रत्येक घरात एक Shared Experience निर्माण केला. टीव्हीने आपल्याला जग दाखवले, आपण टीव्हीच्या माध्यमातून जगाला पाहिले. रामायण आणि महाभारत पाहतानाचा तो सामूहिक अनुभव, जेव्हा संपूर्ण देश एकाच वेळी, एकाच ठिकाणी खिळलेला असायचा, तो आज मोबाईलच्या व्यक्तिगत स्क्रीनमुळे हरवला आहे. आज जरी मनोरंजन, शिक्षण आणि माहिती आपल्या हातातील मोबाईलमध्ये केंद्रित झाली असली, तरी तो व्यक्तिगत अनुभव सामूहिक अनुभवाची जागा घेऊ शकत नाही. टीव्हीचे हेच मोठे योगदान आहे. त्याने आपल्याला एकत्रित केले. टीव्ही कालबाह्य झाला नाही, पण त्याचे ‘माध्यम’ म्हणून असलेले महत्त्व कमी झाले आहे. तो आता फक्त एक ‘उपकरण’ आहे. हा बदल स्वीकारावा लागेल.




