spot_img

World Economic Forum 2026 : दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राचा गुंतवणूक धमाका

spot_img

पहिल्याच दिवशी 14.5 लाख कोटींचे करार, 15 लाख रोजगारनिर्मितीचा मार्ग मोकळा

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत महाराष्ट्राने ऐतिहासिक कामगिरी करत गुंतवणुकीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अवघ्या पहिल्याच दिवशी देशी-विदेशी कंपन्यांसोबत तब्बल 14.5 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत. या करारांमुळे राज्यात सुमारे 15 लाख नव्या रोजगार संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.

उद्योग गुंतवणुकीसोबतच महाराष्ट्रातील शहरांना जागतिक दर्जाचे बनवण्यासाठी महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय करारही करण्यात आले आहेत. मुंबईसाठी ‘डिजिटल ट्वीन’ प्रकल्प राबवण्यात येणार असून, यासाठी लंडनच्या अर्बन फ्युचर्स कलेक्टिव्हसोबत भागीदारी करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे शहर नियोजन, वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्ती नियंत्रण अधिक प्रभावी होणार आहे. याशिवाय, जर्मनीच्या टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिकसोबत सार्वजनिक वाहतूक सुधारणा आणि सिंगापूरच्या सेम्बकॉर्प कंपनीसोबत पर्यावरणपूरक औद्योगिक पार्कसाठी तंत्रज्ञान सहकार्य करण्यात आले आहे.

या गुंतवणुकीत लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट, आयटी, डेटा सेंटर्स, ऊर्जा आणि स्टील क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांचा सहभाग आहे. लॉजिस्टिक्स क्षेत्रात SBG ग्रुपसोबत 20 अब्ज डॉलर्सचा करार करण्यात आला असून त्यामुळे सुमारे 4.5 लाख रोजगार निर्माण होणार आहेत. रिअल इस्टेट व पायाभूत सुविधांसाठी सुमितोमो, के. राहेजा कॉर्प आणि पंचशील रिअॅल्टीसह मोठ्या गुंतवणुकीचे करार झाले आहेत.

डेटा सेंटर क्षेत्रात लोढा डेव्हलपर्सकडून 1 लाख कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून त्यातून 1.5 लाख रोजगार निर्माण होतील. ऊर्जा व स्टील क्षेत्रातही हजारो कोटींच्या करारांमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.

या सर्व करारांमुळे महाराष्ट्राच्या 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल अधिक वेगाने होणार आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेला अजून काही दिवस बाकी असून, या काळात मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा क्षेत्रात आणखी मोठ्या गुंतवणुकीचे करार होण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ