spot_img

Steam From Mouth : हिवाळ्यात श्वास घेताना तोंडातून वाफ का निघते? जाणून घ्या यामागचं शास्त्रीय कारण

spot_img

थंडीमध्ये दिसणारी ‘वाफ’ म्हणजे काय? उन्हाळ्यात ती का दिसत नाही? आरोग्याशी याचा काय संबंध आहे?

हिवाळ्याच्या दिवसांत सकाळी किंवा रात्री बोलताना, हसताना किंवा श्वास सोडताना तोंडातून पांढऱ्या रंगाची वाफ निघताना आपल्याला अनेकदा दिसते. विशेषतः परदेशी चित्रपटांमध्ये हा प्रकार हमखास पाहायला मिळतो. मात्र थंडी वाढली की भारतातही अशीच वाफ दिसू लागते. अनेकांना हे दृश्य कुतूहल वाटते. पण ही वाफ नेमकी येते तरी कुठून? आणि उन्हाळ्यात ती का दिसत नाही? यामागे एक सोपं पण महत्त्वाचं शास्त्रीय कारण आहे.

तोंडातून वाफ कशी तयार होते?

मानवी शरीरामध्ये सुमारे 70 टक्के पाणी असते. फुफ्फुसांच्या आत देखील ओलसर वातावरण असते. जेव्हा आपण श्वास घेतो आणि सोडतो, तेव्हा कार्बन डायऑक्साइडसोबत शरीरातील उष्णता आणि आर्द्रता बाहेर सोडली जाते. ही आर्द्रता वायूच्या स्वरूपात असल्यामुळे ती सामान्यतः डोळ्यांना दिसत नाही.

मात्र हिवाळ्यात बाहेरील तापमान खूप कमी असते. अशा वेळी शरीरातून बाहेर पडणारी उष्ण, ओलसर हवा थंड वातावरणाच्या संपर्कात येते. त्यामुळे ही अदृश्य आर्द्रता लगेचच पाण्याच्या अतिशय सूक्ष्म थेंबांमध्ये रूपांतरित होते. हेच सूक्ष्म थेंब आपल्याला तोंडातून वाफ निघाल्यासारखे दिसतात.

उन्हाळ्यात तोंडातून वाफ का दिसत नाही?

उन्हाळ्यात बाहेरील तापमान शरीराच्या तापमानाच्या जवळपास असते. त्यामुळे श्वास सोडताना बाहेर पडणाऱ्या उष्ण वायूंवर वातावरणातील तापमानाचा फारसा परिणाम होत नाही. आर्द्रता पाण्याच्या थेंबात बदलत नाही आणि म्हणूनच उन्हाळ्यात तोंडातून वाफ दिसत नाही.

तोंडातून वाफ येणं धोक्याचं आहे का?

हिवाळ्यात तोंडातून वाफ निघणे ही पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती चिंतेची बाब नाही. मात्र जर वाफ खूप जास्त प्रमाणात येत असेल आणि त्यासोबत सर्दी, खोकला, नाक बंद होणे किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवत असेल, तर ते इन्फेक्शनचे लक्षण असू शकते.

विशेषतः नाक बंद असल्यामुळे सतत तोंडाने श्वास घेतल्यास घसा कोरडा पडणे, श्वसनाचे त्रास, झोपेतील अडथळे किंवा फुफ्फुसांशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचं तर, हिवाळ्यात तोंडातून वाफ निघणं स्वाभाविक आहे. मात्र शरीर इतर त्रासांचे संकेत देत असेल, तर त्याकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ