शिक्षक ते कोट्यधीश असा प्रवास, आलिशान आयुष्य आणि गंभीर लैंगिक आरोपांमुळे जेफ्री एपस्टीन पुन्हा जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी
सध्या अमेरिका आणि जगभरात जेफ्री एपस्टीनशी संबंधित कागदपत्रे, फोटो आणि व्हिडीओ सार्वजनिक झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या तथाकथित “एपस्टीन फाईल्स”मध्ये अमेरिकेचे माजी आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष, उद्योगजगतातील दिग्गज, तसेच जागतिक स्तरावरील प्रसिद्ध व्यक्तींची नावे समोर आली आहेत. काही फोटोंमध्ये या व्यक्ती एपस्टीनसोबत किंवा तरुणींसह दिसत असल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
जेफ्री एपस्टीनवर अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप होते. यापूर्वी एका प्रकरणात त्याला १८ महिन्यांची शिक्षा झाली होती. आता अमेरिकन काँग्रेसने हजारो पानांची न्यायालयीन कागदपत्रे आणि काही फोटो सार्वजनिक केल्याने हे प्रकरण पुन्हा ऐरणीवर आले आहे. डेमोक्रॅट्स पक्षाने याआधी प्रसिद्ध केलेल्या फोटोंनंतर आता नव्या खुलास्यांमुळे अनेक प्रभावशाली व्यक्ती अडचणीत आल्याचे चित्र आहे.
जेफ्री एपस्टीनचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झाला. सुरुवातीला तो डॉल्टन स्कूलमध्ये गणित आणि भौतिकशास्त्र शिकवत होता. विद्यापीठीन शिक्षण पूर्ण न करताही, एका विद्यार्थ्याच्या वडिलांच्या ओळखीमुळे त्याला वॉल स्ट्रीटमध्ये प्रवेश मिळाला. काही वर्षांतच तो गुंतवणूक बँकेचा भागीदार बनला आणि पुढे स्वतःची ‘जे. एपस्टीन अँड कंपनी’ ही फर्म स्थापन केली. अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या ग्राहकांचे आर्थिक व्यवस्थापन करत करत तो अत्यंत श्रीमंत झाला.
या यशातून एपस्टीनने न्यूयॉर्क, फ्लोरिडा आणि न्यू मेक्सिकोमध्ये आलिशान मालमत्ता उभारल्या. त्याच्या घरी भव्य पार्ट्या होत असत, जिथे राजकारणी, उद्योगपती, कलाकार आणि आंतरराष्ट्रीय नेते उपस्थित राहत. डोनाल्ड ट्रम्प यांच्याशीही त्याची ओळख आणि मैत्री होती, जी नंतर तुटल्याचे ट्रम्प यांनीच मान्य केले.
एपस्टीनकडे अमेरिकेच्या व्हर्जिन आयलंडमध्ये दोन खासगी बेटे होती. या बेटांवरच त्याच्या लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला. २०२३ मध्ये ही बेटे विकली गेली आणि त्या पैशांचा वापर पीडितांशी सेटलमेंटसाठी झाल्याची माहिती समोर आली. मृत्यूसमयी एपस्टीनची संपत्ती अंदाजे ५६० ते ६०० दशलक्ष डॉलर्स इतकी होती. त्याची बहुतांश संपत्ती ऑफशोअर ट्रस्ट आणि गुप्त गुंतवणुकीत लपवलेली असल्याने त्याच्या आर्थिक साम्राज्याबाबत आजही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
२०१९ मध्ये तुरुंगात असताना एपस्टीनचा मृत्यू झाला. अधिकृतरित्या आत्महत्या सांगितली जात असली, तरी अनेकांनी त्यावर शंका व्यक्त केली. खरा वाद मात्र २०२४ मध्ये सुरू झाला, जेव्हा सुमारे ९५० पानांची न्यायालयीन कागदपत्रे उघड करण्यात आली. यात बिल क्लिंटन, प्रिन्स अँड्र्यू, बिल गेट्स आणि डोनाल्ड ट्रम्प यांसारखी नावे समोर आली. मात्र, केवळ नावांचा उल्लेख म्हणजे थेट आरोप असा अर्थ होत नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अलीकडे प्रसिद्ध झालेल्या १९ फोटोंमध्ये डोनाल्ड ट्रम्पसह अनेक प्रसिद्ध व्यक्ती दिसतात. यामध्ये बिल गेट्स, नोम चॉम्स्की आणि स्टीव्ह बॅनन यांचाही समावेश आहे. डेमोक्रॅटिक कायदेकर्त्यांनी स्पष्ट केले आहे की, या फोटोंमधील उपस्थिती ही गुन्ह्याचा पुरावा नाही. पारदर्शकता राखण्याच्या उद्देशानेच हे फोटो आणि कागदपत्रे सार्वजनिक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एपस्टीन फाईल्समुळे सत्तेच्या, पैशाच्या आणि प्रभावाच्या जगातील अनेक अस्वस्थ करणारे पैलू पुन्हा एकदा जगासमोर आले आहेत.




