लाफायेट पार्कमध्ये अज्ञात हल्लेखोराचा गोळीबार, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प इमारतीत असतानाच घडला प्रकार; सुरक्षा यंत्रणांकडून आरोपीचा शोध सुरू
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध महिना उलटला तरी थांबण्याचे नाव घेत नाहीये. एकीकडे होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिला असतानाच, आता खुद्द ट्रम्प यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेचे अधिकृत निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊस समोरील ‘लाफायेट पार्क’ परिसरात भीषण गोळीबार झाला आहे. विशेष म्हणजे, ज्यावेळी हा गोळीबार झाला, तेव्हा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्येच उपस्थित होते, ज्यामुळे अमेरिकन सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या गोळीबारात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र गोळीबार करणारा मुख्य आरोपी घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाला आहे. अमेरिकन पोलीस, एफबीआय आणि गुप्तचर यंत्रणांनी सध्या संपूर्ण वॉशिंग्टन डीसी परिसरात हाय-अलर्ट जारी केला असून फरार आरोपीच्या वाहनाचा कसून शोध घेतला जात आहे. व्हाईट हाऊसच्या आजूबाजूचा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला असून, प्रत्येक संशयास्पद हालचालीवर कडक नजर ठेवली जात आहे. ट्रम्प यांच्या निवासस्थानापासून अत्यंत जवळ ही घटना घडल्याने यामागे काही मोठे षडयंत्र तर नाही ना, या दिशेने तपास सुरू आहे.
अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देणारी ही गेल्या आठवड्यातील दुसरी मोठी घटना आहे. काही दिवसांपूर्वीच फ्लोरिडा येथे ट्रम्प यांच्या खासगी मालमत्तेवर एक संशयास्पद विमान घिरट्या घालताना दिसले होते, ज्यासाठी अमेरिकेला आपली F-16 फायटर जेट्स तैनात करावी लागली होती. आता थेट व्हाईट हाऊसच्या उंबरठ्यावर झालेला हा गोळीबार आणि इराणसोबत सुरू असलेले युद्ध, या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा अत्यंत गंभीर झाला आहे. इराणने ट्रम्प यांना लक्ष्य करण्याची धमकी आधीच दिली असल्याने, या गोळीबाराच्या घटनेने अमेरिकन लष्कर आणि पोलीस दलात युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.




