spot_img

White Discharge problem : महिलांमध्ये वाढतोय पांढऱ्या स्त्रावाचा त्रास? डॉक्टरांनी सांगितले कारण आणि सोपा घरगुती उपाय

spot_img

पाळीच्या आधी-नंतरचा व्हाईट डिस्चार्ज कधी नॉर्मल, तर कधी धोक्याची घंटा; दुर्लक्ष केल्यास वाढू शकतो अशक्तपणा

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक महिला काम, जबाबदाऱ्या आणि ताणतणाव यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. सततची दगदग, अनियमित दिनचर्या, प्रदूषण आणि जंकफूड याचा थेट परिणाम महिलांच्या शरीरावर होत आहे. यामुळे मासिक पाळीच्या तक्रारी, हार्मोन्सचा असमतोल आणि पांढऱ्या स्त्रावाचं (व्हाईट डिस्चार्ज) प्रमाण वाढल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत.

हल्ली काही महिलांमध्ये पाळी सुरू होण्याआधी किंवा पाळीनंतर पांढरा स्त्राव जास्त प्रमाणात जाण्याचं दिसून येतं. काही वेळा हा स्त्राव इतका वारंवार होतो की, तो पाळीसारखाच वाटतो आणि त्यामुळे अनेकजणी घाबरून जातात. या पांढऱ्या स्त्रावामुळे शरीरात अशक्तपणा येणे, अंगदुखी, पाठदुखी, पाय दुखणे अशा तक्रारीही वाढू शकतात.

मात्र, या समस्येला घाबरण्याची गरज नाही, असं तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. वेळीच लक्ष दिलं आणि योग्य उपचार घेतले, तर हा त्रास आटोक्यात येऊ शकतो. प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर ऋचा मेहेंदळे पै यांनी एका मुलाखतीत या विषयावर सविस्तर माहिती दिली आहे.

डॉ. ऋचा सांगतात की, “पाळीच्या आधी आणि नंतर थोड्या प्रमाणात पांढरा स्त्राव होणं हे सामान्य आहे. पण काही महिलांमध्ये तो रोजच्या रोज आणि जास्त प्रमाणात होत असेल, तर ते नॉर्मल नाही. अशा वेळी बॅक्टेरियल इन्फेक्शनची शक्यता वाढते. याकडे दुर्लक्ष केल्यास शरीरात खूप अशक्तपणा येतो, वेदना वाढतात आणि महिलांना नेमका त्रास कशामुळे आहे हेही लक्षात येत नाही.”

त्या पुढे सांगतात की, अनेक महिला पाय किंवा पाठदुखीला ‘वाताचा त्रास’ समजतात. तपासणीदरम्यान जेव्हा त्यांना रोज व्हाईट डिस्चार्ज होत असल्याचं स्पष्ट होतं, तेव्हा खरा कारण समोर येतो. रोज पांढरा स्त्राव जाणं हे आरोग्यासाठी योग्य नाही, असं त्या ठामपणे सांगतात.

उपाय सांगताना डॉ. ऋचा यांनी एक सोपा आणि घरगुती उपाय सुचवला आहे. “तांदळाचं धुवण हे यावर अतिशय उपयुक्त ठरू शकतं. तांदूळ नीट स्वच्छ धुवून घ्यावेत, त्यावरची पावडर किंवा रसायनं पूर्णपणे निघाली पाहिजेत. त्यानंतर रोज रात्री तांदूळ पाण्यात भिजत घालावेत आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यावं. यामुळे पांढऱ्या स्त्रावाचं प्रमाण कमी होण्यास मदत होते,” असं त्यांनी सांगितलं.

तथापि, जर हा त्रास जास्त असेल किंवा दीर्घकाळ टिकत असेल, तर केवळ घरगुती उपायांवर अवलंबून न राहता डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. वेळेवर उपचार आणि थोडीशी काळजी घेतली, तर महिलांना या समस्येपासून नक्कीच दिलासा मिळू शकतो.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ