उत्तरेकडील शीत वाऱ्यांच्या प्रवाहामुळे महाराष्ट्रात किमान तापमानात (Minimum Temperature) लक्षणीय घट झाली आहे. तर या थंडीचा परिणाम उत्तर व मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातही जाणवू लागला आहे. अशातच विदर्भासह नागपुरात आजही थंडीची लाट पसरल्याचे चित्र आहे. नागपुरात आज (7 जानेवारी) सकाळच्या सुमारास 8.0 अंश सेल्सियस इतक्या किमान तापमानाची नोंद (Weather Update) करण्यात आली आहे. तर गोंदिया जिल्ह्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आता दिवसाही थंडीचा सामना करावा लागतो आहे.
राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद गोंदिया जिल्ह्यात करण्यात आली आहे. गोंदियाचे आजचे (7 जानेवारी) तापमान 7.6 अंश सेल्सियस इतके आहे. सलग दुसऱ्या दिवशी गोंदियाचे तापमान राज्यात सर्वात कमी असल्याची माहिती आहे. यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यात थंडीची लाट पसरली असून बहुतांश जिल्ह्यातील तापमान 10 अंशाच्या खाली गेल्याचे चित्र आहे. यवतमाळमध्ये 9.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उत्तर भारतात थंडीची लाटेचा परिणाम आता विदर्भावर देखील झाल्याचे दिसून आलं आहे. तर पुढील तीन दिवस थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.




