Weather Alert : राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ

spot_img

दुपारी १२ ते ४ ‘हिट वेव्ह’चा तडाखा; मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात गारपिटीमुळे द्राक्ष-कांद्याचे कोट्यवधींचे नुकसान

महाराष्ट्रात सध्या हवामानाचा विचित्र खेळ पाहायला मिळत असून, एकाच वेळी तीव्र उष्णता आणि अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटाने नागरिक आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत. कोकणात जिथे उष्ण आणि दमट हवामानामुळे ‘हिट वेव्ह’चा इशारा देण्यात आला असून दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे कठीण झाले आहे, तिथेच दुसरीकडे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता असून सोमवारपासून हा जोर अधिक वाढणार असल्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने (IMD) दिले आहेत. मार्च महिना संपत आला तरी पावसाचा मुक्काम हलत नसल्याने ‘रब्बी’च्या हंगामावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या अवकाळी पावसाचा सर्वात भीषण फटका शेतीला बसला असून हाताशी आलेली पिके डोळ्यादेखत मातीमोल होत आहेत. नाशिकच्या चांदवड भागात तासभर चाललेल्या मुसळधार पावसामुळे काढणीला आलेला गहू, हरभरा आणि कांदा पूर्णपणे भिजला आहे. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील पापरी गावातून तर काळजाचा थरकाप उडवणारे चित्र समोर आले आहे; तिथे झालेल्या भीषण गारपिटीमुळे ७ एकरवरील द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. एकीकडे ६० लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा असताना आता पदरी फक्त निराशा उरली असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सरकारकडे तात्काळ मदतीची याचना केली आहे. सध्या प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू असले, तरी निसर्गाच्या या लहरीपणामुळे बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ