कोल्हापूर महानगरपालिका (Kolhapur Municipal Corporation) कोणत्याही परिस्थितीत ताब्यात ठेवण्यासाठी एकहाती दंड थोपटलेल्या काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते तथा कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांना ऐन निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसला आहे. गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील उर्फ आबाजी हे उद्या (10 जानेवारी) शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसला निवडणुकीमध्येच मोठा धक्का बसला आहे. अर्थात महापालिकेच्या राजकारणामध्ये विश्वास पाटील मोठे नाव नसलं तरी जिल्ह्याच्या राजकारणात गोकुळ हा सर्वात मोठा सहकारातील केंद्रबिंदू आहे. या ठिकाणी सत्ता अबाधित ठेवण्यासाठी सतेज पाटील यांना आगामी निवडणुकीमध्ये मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
पिश्वास पाटील यांची करवीर तालुक्यात दूध संस्थांच्या माध्यमातून ताकद आहे. 40 वर्षांहून अधिक काळ ते सक्रिय राजकारणात असल्याने त्यांचा प्रत्येक गावात कमी-अधिक प्रमाणात गट आहे. त्यामुळे स्वर्गीय आमदार राहुल पाटील यांनी काँग्रेस सोडल्यानंतर तालुक्यातील काँग्रेसची जबाबदारी पाटील यांनी घ्यावी, असा आग्रह आमदार सतेज पाटील यांचा हाेता. पण, त्यांनी सावध भूमिका घेत आपले पत्ते खुले केले नव्हते.




