“मुख्यमंत्र्यांच्या धाडसामुळेच खरात गजाआड”,पडळकरांचा दावा
नाशिकमधून समोर आलेल्या भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कर्तृत्वाने केवळ महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण देश हादरला आहे. राजकीय वरदहस्ताचा वापर करून खरातने अनेक निष्पाप महिला आणि व्यापाऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचे आता उघड झाले आहे. या प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. चंद्रपूर येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधत एक खळबळजनक विधान केले. “जर अशोक खरातच्या जागी एखादा मुसलमान आरोपी असता, तर आतापर्यंत सर्व मुसलमानांची वरात काढली असती,” असे म्हणत त्यांनी सध्याच्या सामाजिक मानसिकतेवर ताशेरे ओढले. कोणत्याही व्यक्तीचा जात-धर्म न पाहता, नालायकाला नालायक म्हणण्याची हिंमत समाजाने दाखवावी, अशी कानउघडणीही त्यांनी यावेळी केली.
वडेट्टीवारांच्या या विधानाला भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. खरातला अटक करण्यात आणि हे संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करण्यात सरकारचाच मोठा वाटा असल्याचा दावा त्यांनी केला. “हे प्रकरण जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आले, तेव्हा त्यांनी तातडीने नाशिक पोलिसांना आदेश दिले आणि रात्रीतून अत्यंत गुप्तपणे खरातला बेड्या ठोकल्या,” असे पडळकर म्हणाले. खरातचे एकामागून एक धक्कादायक कारनामे बाहेर येत असतानाच, आता या प्रकरणाला गुन्हेगारीसोबतच ‘राजकीय थ्रिलर’चे स्वरूप प्राप्त झाले आहे.
सध्या चर्चा केवळ खरातच्या गुन्ह्यांचीच नाही, तर त्याभोवती विणल्या जाणाऱ्या राजकीय कथांचीही आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आरोपी खरात आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचा धक्कादायक दावाही केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती किती खोलवर आहे, याबद्दल आता सर्वसामान्यांमध्ये तर्कवितर्क लढवले जात आहेत. सरकार आणि विरोधकांमधील हे ‘खरात द्वंद्व’ येणाऱ्या काळात कोणत्या थराला जाते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.




