कोरडी त्वचा, तडकलेले ओठ ते परफ्यूम टिकवण्यापर्यंत थंडीमध्ये व्हॅसलीनचे पाच अनोखे फायदे
हिवाळा सुरू झाला की त्वचा कोरडी पडणे, ओठ तडकणे, टाचांना भेगा पडणे अशा अनेक समस्या त्रासदायक ठरतात. हवेतली आर्द्रता कमी झाल्यामुळे त्वचा निर्जीव दिसू लागते आणि त्यावर उपाय म्हणून बहुतेकांच्या घरात सहज सापडणारं एकच साधं पण प्रभावी उत्पादन म्हणजे व्हॅसलीन किंवा पेट्रोलियम जेली.
सामान्यतः आपण ते फक्त ओठांवर लावतो, पण व्हॅसलीनचे अनेक इतर उपयोगही तितकेच फायदेशीर आहेत. थंडीत त्याचे हे पाच उपयोग विशेषतः मदत करू शकतात.
तडकलेल्या ओठांसाठी उत्तम उपाय
ओठ जास्त कोरडे होऊन तडकायला लागले की वेदना होते, कधीकधी रक्तही येते. अशावेळी व्हॅसलीन ओठांवर संरक्षक थर तयार करून ओलावा टिकवते आणि आराम देते.
सर्दीमध्ये नाकाभोवतीची कोरडी त्वचा
थंडीमुळे सर्दी झाल्यावर वारंवार नाक पुसल्याने नाकाभोवतीची त्वचा लाल, कोरडी आणि खवलेदार होते. त्या जागी हलकी व्हॅसलीन लावल्याने त्वचा मऊ होते. काहीजण थोडे गरम केलेल्या व्हॅसलीनचा वास घेऊनही आराम मिळतो असे सांगतात.
टाचांच्या भेगांवर परिणामकारक
हिवाळ्यात टाचा फुटणे सामान्य, पण वेदनादायक. झोपण्यापूर्वी टाचांवर व्हॅसलीन लावून मोजे घातल्यास काही दिवसांत टाचा मऊ आणि सुरळीत होतात.
परफ्यूम जास्त वेळ टिकवण्यासाठी
परफ्यूम लावण्यापूर्वी मनगट, मान आणि कानामागे थोडी व्हॅसलीन लावल्यास तिचा गुळगुळीत थर सुगंध दीर्घकाळ टिकवून ठेवतो.
आयब्रो सेट करण्यासाठी उपयोगी
मेकअपमध्येही व्हॅसलीन उपयुक्त आहे. आयब्रो जेल नसेल तर ब्रशने थोडे व्हॅसलीन आयब्रोवर लावल्याने केस नीट सेट होतात आणि क्लीन, शार्प लूक मिळतो. हिवाळ्यातील दैनंदिन छोट्या अडचणींवर व्हॅसलीन अतिशय सोपा, स्वस्त आणि प्रभावी उपाय ठरू शकतो.




