Vanchit Shetkari : ‘बुलंद छावा’ संघटनेची प्रशासनावर धडक; वंचित शेतकऱ्यांच्या याद्या तहसीलदारांकडे सुपूर्द

spot_img

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसल्यानंतर आता प्रशासकीय दिरंगाईचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘बुलंद छावा मराठा युवा परिषद’ आक्रमक झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित असलेल्या जवळी खुर्द, जवळी बुद्रुक आणि चिंचखेडा खुर्द येथील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेने थेट तहसील कार्यालय गाठले. यावेळी तांत्रिक त्रुटी दूर करून तयार केलेल्या सुधारित याद्या आणि कागदपत्रे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली.

सन २०२४-२५ आणि २०२५-२६ च्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. सरकारने मदत जाहीर केली खरी, परंतु कागदोपत्री घोळ आणि तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकरी अद्याप रिकाम्या हातानेच आहेत. कोणाचे बँक खाते केवायसी (KYC) मुळे अडकले आहे, तर कोणाचे आधार लिंकिंग पूर्ण नसल्याने पैसे जमा होऊ शकले नाहीत. धक्कादायक म्हणजे, काही पात्र शेतकऱ्यांची नावे मूळ यादीतूनच गायब होती. ही गंभीर बाब लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी जवळी खुर्द गाव दत्तक घेत या प्रश्नाचा सविस्तर पाठपुरावा सुरू केला होता.

बुलंद छावा संघटनेच्या शिष्टमंडळाने आज तहसीलदार आणि हसखेडा सजेच्या तलाठी यांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी सादर करण्यात आलेल्या निवेदनात एकूण पाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण याद्यांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने जवळी खुर्दची २०२५-२६ मधील ‘करेक्शन’ यादी, तसेच तिन्ही गावांतील मागील दोन वर्षांतील वंचित लाभार्थ्यांच्या तपशीलवार याद्यांचा समावेश आहे. या याद्यांसोबत शेतकऱ्यांच्या बँक पासबुकच्या प्रती आणि इतर आवश्यक कागदपत्रेही जोडण्यात आली आहेत, जेणेकरून प्रशासनाला प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये.

या शिष्टमंडळात जिल्हा संपर्क प्रमुख ऋषिकेश मोहिते पाटील यांच्यासह वाल्मिक हारदे, सतीश सालपुरे, गोविंद बनकर यांसारख्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता. प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्याचे आश्वासन दिले आहे. “शेतकऱ्यांच्या हक्काचा एकही पैसा मिळेपर्यंत आमचा लढा थांबणार नाही. केवळ तांत्रिक चुकांमुळे बळीराजाला मदतीपासून वंचित ठेवणे हा अन्याय आहे,” अशी ठाम भूमिका बुलंद छावा संघटनेने यावेळी मांडली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ