पांगरी येथील कारखाना विक्रीच्या निर्णयाविरोधात रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली कायदेशीर लढाई
शेतकऱ्यांचा संतापबीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, जो दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath munde) यांनी स्थापन केला होता, त्याच्या विक्रीच्या निर्णयाने सहकार क्षेत्रात मोठा वाद निर्माण झाला आहे. या कारखान्याची 132 कोटी रुपयांना ओमकार ग्रुपला विक्री 14 ऑगस्ट 2025 रोजी अंबाजोगाई येथील निबंधक कार्यालयात नोंदवली गेली. मात्र, हा निर्णय शेतकरी आणि सभासदांना विश्वासात न घेता घेण्यात आल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केला आहे. या विरोधात संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikanth tupkar) यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.
संघटनेचे कार्यकर्ते कुलदीप करपे यांनी प्रश्न उपस्थित केला की, परळी तालुक्यातील कारखाना अंबाजोगाई येथे कसा विकला जाऊ शकतो? हा कारखाना कौठळी तांडा येथील कुळाच्या जमिनीवर असून, अशा जमिनीच्या विक्रीवर कायदेशीर बंधने आहेत. तसेच, करारावर पंकजा मुंडे (Pankaja munde) आणि संचालक मंडळाच्या सह्या असल्या तरी यशश्री मुंडे यांची सही नसल्याने त्यांनी हा व्यवहार मान्य केला नसल्याचा संशय व्यक्त होत आहे.
संघटनेने हा व्यवहार कवडीमोल दराने करून बँकांचे कर्ज बुडविण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप केला आहे. याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याचबरोबर, कायदेशीर सल्लागार परमेश्वर गीते यांनीही या व्यवहारावर आक्षेप घेत बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे खरेदीखताला स्थगिती देण्याची विनंती केली आहे.क्रांतिकारी शेतकरी संघटनेने चेतावणी दिली आहे की, या प्रकरणात दोषींवर कारवाई न झाल्यास गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी बेमुदत उपोषण केले जाईल. या आंदोलनामुळे सहकार क्षेत्रात तीव्र घडामोडी घडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे हा विषय आणखी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.




