अनुष्का सरकटे आणि इंद्रनील कामत प्रथमच एकत्र; अन्यायाविरुद्ध उभ्या राहणाऱ्या तरुण वकिलाची ताकदीची गोष्ट
विविध विषयांवर आधारित प्रभावी कथा आणि दमदार पात्रांद्वारे प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीने आता एक नवी मालिका सादर करण्याची घोषणा केली आहे. ‘वचन दिले तू मला’ या मालिकेद्वारे न्यायासाठी झगडणाऱ्या ऊर्जा शिंदे नावाच्या धाडसी वकिलाची प्रवासकथा प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. या कथेत ऊर्जाला समर्थ साथ देणारा वकील शौर्य जहागिरदार तिच्या लढाईचा महत्त्वाचा भाग ठरणार आहे.
एक संवेदनशील छेडछाड प्रकरण हाताळताना ऊर्जा निर्धाराने न्यायासाठी उभी राहते. तिच्यापुढे प्रतिस्पर्धी म्हणून उभा असतो स्वतःच्या अहंकारात बुडललेला, अनुभवी वकील हर्षवर्धन जहागिरदार. ऊर्जा त्याला कायदेशीर आव्हान देते तेव्हा त्याच्या अहंकाराला मोठा धक्का बसतो आणि यानंतर ऊर्जा व हर्षवर्धन यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होतो.
या मालिकेत अनुष्का सरकटे ऊर्जा शिंदेची भूमिका साकारत असून, इंद्रनील कामत शौर्यच्या भूमिकेत दिसणार आहे. दोघांची ही नवी जोडी प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. ‘सेव्हन्थ सेन्स मीडिया’ या शशांक सोळंकी यांच्या निर्मिती संस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे.
ऊर्जाच्या भूमिकेबद्दल अनुष्का सांगते, “स्टार प्रवाहवर पहिल्यांदाच काम करताना अपार आनंद झाला. ऊर्जा ही एका प्रामाणिक वकिलाची मुलगी असून तिच्या वडिलांना भ्रष्ट व्यवस्थेमुळे जीव गमवावा लागला. वडिलांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याची तिच्या मनात प्रचंड जिद्द आहे.” अभिनेता इंद्रनील कामत म्हणतो, “शौर्य जहागिरदार खूप सरळ, प्रेमळ आणि सज्जन व्यक्ती आहे. अशा भूमिकेत प्रथमच काम करत असल्याने खूप उत्सुकता आहे.”
स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे यांनी मालिकेबद्दल बोलताना सांगितले की, “सामाजिक संदेशासोबत करमणुकीचा उत्तम समतोल साधणारी ही मालिका आहे. ऊर्जासारखी बुद्धीमान, निर्भय आणि स्वप्नांसाठी झगडणारी मुलगी प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. तिच्या प्रवासात शौर्यची साथ कशी उभी राहते हे मालिकेतून पाहायला मिळेल.”




