F-15E फायटर जेट पाडल्यानंतर इराणने लावले होते बक्षीस; ‘God is good’ संदेशाने बदलले अमेरिकन सैन्याचे नशीब, ट्रम्प यांनी सांगितला तो थरार
अमेरिका आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थितीने सध्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. याच संघर्षादरम्यान अमेरिकेचे अत्याधुनिक F-15E स्ट्राइक इगल फायटर जेट इराणने पाडल्याची धक्कादायक घटना घडली. विमानात एक पायलट आणि एक वेपन्स सिस्टम ऑफिसर (WSO) असे दोन अधिकारी होते. विमान कोसळण्यापूर्वी दोघांनीही पॅराशूटच्या साहाय्याने उडी मारली, मात्र ते शत्रू राष्ट्राच्या दुर्गम भागात वेगवेगळ्या ठिकाणी लँड झाले. इराणच्या सैन्याने त्यांना जिवंत पकडण्यासाठी बक्षिसाची घोषणा करून संपूर्ण परिसर पिंजून काढला होता, पण तिथेच नियतीने एक मोठा चमत्कार घडवून आणला.
विमान कोसळल्यानंतर वेपन्स सिस्टम ऑफिसर गंभीर जखमी झाला होता. शत्रूच्या तावडीत सापडण्याऐवजी त्याने डोंगराच्या आडोशाला लपून राहणे पसंत केले. जीव वाचवण्याच्या धडपडीत त्याने अमेरिकन मुख्यालयाला अवघ्या तीन शब्दांचा एक गुढ संदेश पाठवला – ‘God is Good’ (देव चांगला आहे). सुरुवातीला अमेरिकन प्रशासनाला वाटले की ही इराणची एखादी चाल असू शकते. मात्र, तो अधिकारी अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचा असल्याची खात्री पटताच, अमेरिकेने तातडीने त्याचे लोकेशन ट्रॅक केले. खुद्द राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या थराराचा खुलासा करताना सांगितले की, या संदेशामुळेच आम्हाला आमचा अधिकारी जिवंत असल्याची खात्री पटली.
या दोन्ही वीरांना वाचवण्यासाठी अमेरिकेने दोन विशेष मोहिमा राबवल्या. दिवसा राबवलेल्या पहिल्या ऑपरेशनमध्ये वैमानिकाला (पायलट) सुरक्षित बाहेर काढण्यात आले, तर रात्रीच्या अंधारात जीवघेणी जोखीम पत्करून जखमी वेपन्स सिस्टम ऑफिसरचे रेस्क्यू करण्यात आले. इराणच्या नाकावर टिच्चून अमेरिकेने आपल्या दोन्ही सैनिकांना मृत्यूच्या दारातून सुखरूप परत आणले. हा थरार एखाद्या हॉलिवूडपटापेक्षा कमी नव्हता, ज्याची चर्चा आता जगभरात रंगली आहे.




