बळीराजाच्या डोळ्यांत पाणी; हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला, पंचनाम्यांची आर्त हाक
गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राला अवकाळी पाऊस आणि भीषण गारपिटीने झोडपून काढले आहे. चैत्र महिन्याच्या उन्हात अचानक आलेल्या या ‘अस्मानी’ संकटामुळे राज्यातील शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक गर्तेत सापडला आहे. जालना, पालघर, नंदुरबार, वाशिम, अहिल्यानगर, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आणि नांदेड या जिल्ह्यांना निसर्गाच्या कोपाचा सर्वाधिक फटका बसला आहे. कुठे गव्हाची काढणी सुरू होती, तर कुठे खळ्यावरचे धान्य भिजले; विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसाने उभ्या पिकांचे अक्षरशः मातेरं केलं आहे.
जालना आणि बीड जिल्ह्यांत तर गारांचा इतका प्रचंड खच पडला की जणू बर्फाची चादर पसरली होती. यामुळे कांदा, गहू आणि फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये द्राक्ष बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, काढणीला आलेली द्राक्ष बाग भुईसपाट झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे. नांदेडच्या अर्धापूर भागात मेहनतीने शिजवून वाळत घातलेली हळद भिजल्याने नगदी पिकावर विसंबून असलेला शेतकरी हवालदिल झाला आहे. केवळ शेतीच नव्हे, तर वाशिममध्ये मूर्तिकार बांधवांच्या कष्टावरही पाणी फिरले असून तयार केलेल्या मूर्ती पावसात भिजून मोठे नुकसान झाले आहे. सध्या राज्यभरातून तातडीने पंचनामे करून मदतीची मागणी होत आहे.




