Unseasonal Rain In Maharashtra : राज्यात पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा इशारा; गारपीट आणि जोरदार वाऱ्याची शक्यता

spot_img

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अलर्ट; धुळे व गोंदियात पिकांचे मोठे नुकसान.

महाराष्ट्र राज्यात पुढील 3 ते 4 दिवस हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून, अवकाळी पाऊस, गारपीट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये आज हलक्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यांतील काही भागात गारपीट होण्याची शक्यता असून, मध्य महाराष्ट्रातही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग 50 ते 60 किमी प्रतितास राहू शकतो.

विदर्भात अमरावती, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ येथे गारपिटीसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. हजारो हेक्टरवरील पिके बाधित झाली असून कांदा, मका, बाजरी आणि भाजीपाला यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच फळबागांनाही फटका बसला आहे.

तसेच गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातही वादळी वाऱ्यांसह पावसामुळे मका पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके जमीनदोस्त झाली असून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी विविध भागातून होत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ