Unseasonal Rain 2026 : अवकाळी पाऊस आणि गारपिटीने राज्याला झोडपले; बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला

spot_img

जालना ते जळगावपर्यंत पिकांचे मातीमोल; वीज पडून पशुधनाची हानी, हवालदिल शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीसाठी आर्त हाक

गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत निसर्गाचा कोप पाहायला मिळाला असून, वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस आणि भीषण गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. जालना, जळगाव, पुणे, नांदेड आणि बुलढाणा यांसह अनेक जिल्ह्यांत पावसाने अक्षरशः तांडव केले. जालन्यात द्राक्षांच्या बागा जमिनीवर लोळल्या असून, जळगावमध्ये काढणीला आलेला गहू मातीमोल झाला आहे. या संकटामुळे केवळ पिकांचेच नव्हे, तर लग्नसमारंभांसारख्या शुभकार्यांचाही खोळंबा झाला असून, भोकरदनमध्ये चक्क विवाहाचा मंडप उडाल्याने वऱ्हाडी मंडळींची मोठी धावपळ उडाली. निसर्गाच्या या अवकृपेमुळे बळीराजा पुन्हा एकदा उघड्यावर पडला आहे.

या पावसाचा फटका केवळ शेतीलाच बसला नाही, तर पशुधनावरही काळाने झडप घातली आहे. नांदेड आणि बीड जिल्ह्यांत वीज कोसळून अनेक बैलांचा मृत्यू झाला, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पुण्यातील चाकण बाजार समितीत साठवणुकीची योग्य सोय नसल्याने हजारो क्विंटल कांदा पावसात भिजून सडला, ज्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासकीय अनास्थेवर ताशेरे ओढले आहेत. आधीच बाजारभावाचा फटका आणि त्यात आता निसर्गाची मार सोसणारा शेतकरी सध्या पूर्णपणे कोलमडला आहे. “रात्रंदिवस घाम गाळून उभे केलेले पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाले, आता सरकारनेच आमचा आधार व्हावे,” अशी आर्त हाक नुकसानग्रस्त भागातील शेतकरी देत आहेत. तातडीने पंचनामे करून भरपाई मिळावी, हीच आता राज्यातील बळीराजाची प्रमुख मागणी आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ