दोन कॅमेरे, मर्यादित टीम आणि विश्वासाची परीक्षा; अभिनेत्रीने सांगितला पडद्यामागचा अनुभव
सिनेमे आणि वेब सीरिजमध्ये कथानकाच्या गरजेनुसार इंटिमेट सीन दाखवले जातात. मात्र असे सीन करताना कलाकारांच्या मनात मानसिक दडपण, भीती आणि अस्वस्थता असते, हे अनेकदा समोर आलं आहे. अशाच एका अनुभवाबद्दल अभिनेत्री सयानी गुप्ताने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे भाष्य केलं असून तिच्या वक्तव्यामुळे सध्या चर्चांना उधाण आलं आहे.
सयानी गुप्ताने सांगितलं की, एका इंटिमेट सीनच्या शूटिंगदरम्यान ती दोन कॅमेऱ्यांसमोर उभी होती. सेटवर मोजकेच लोक होते, मात्र त्या क्षणी वातावरण असहज झालं होतं. “तो सीन कथेसाठी महत्त्वाचा होता, त्यामुळे मनातील भीती बाजूला ठेवून मला तो करावा लागला,” असं ती म्हणाली.
पुढे ती म्हणाली की, अशा सीनदरम्यान सेटवरील लोकांवर विश्वास ठेवणं फार महत्त्वाचं असतं. “जेव्हा मला हा सीन ऑफर करण्यात आला, तेव्हा त्याबद्दल आधीच माहिती देण्यात आली होती. ज्या टीमसोबत मी काम करत होते, त्यांच्यावर मला विश्वास होता, म्हणूनच मी तो निर्णय घेऊ शकले,” असंही सयानीने स्पष्ट केलं.
सयानी गुप्ताच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर तिने जॉली एलएलबी 2, जग्गा जासूस, आर्टिकल 15, फॅन यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत. वेब सीरिजमधूनही तिने वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सोशल मीडियावरही सयानी प्रचंड सक्रिय असून चाहत्यांशी सतत संवाद साधताना दिसते. तिच्या या प्रामाणिक वक्तव्यामुळे कलाकारांच्या पडद्यामागील वास्तवावर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे.




