spot_img

Uddhav-Raj Thackrey Alliance : १८ वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिकेसाठी शिवसेना–मनसे युती जाहीर

spot_img

जागावाटपावर गुप्तता; ‘राजकीय उमेदवार पळवणाऱ्या टोळ्यां’चा राज ठाकरेंचा टोला

संपूर्ण महाराष्ट्र ज्या क्षणाची उत्सुकतेने वाट पाहत होता, तो ऐतिहासिक क्षण अखेर आज प्रत्यक्षात आला. तब्बल १८ वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र आले असून शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) महापालिका निवडणुकीसाठी युती जाहीर करण्यात आली. वरळीतील एका हॉटेलमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. राज ठाकरे यांनी युतीची अधिकृत घोषणा करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

युती जाहीर झाली असली तरी जागावाटपाबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. कोणता पक्ष कुठे आणि किती जागा लढवणार, याबाबत सध्या पडदा ठेवण्यात आला आहे. हे तपशील आत्ता जाहीर केले जाणार नसल्याचं स्पष्ट करत राज ठाकरे यांनी त्यामागचं कारणही ठाकरे शैलीत सांगितलं.

राज ठाकरे म्हणाले, “आम्हाला जे काही सांगायचं आहे, ते योग्य वेळी जाहीर सभांमधून सांगू. भांडणांपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, हीच भूमिका आधीपासून होती. त्यामुळेच एकत्र येण्याची सुरुवात झाली. जागावाटपाचे आकडे, ठिकाणं आम्ही आत्ता सांगणार नाही.” यामागे टोला लगावत त्यांनी म्हटलं, “सध्या महाराष्ट्रात उमेदवार पळवणाऱ्या टोळ्या फिरत आहेत. त्यात आणखी दोन राजकीय टोळ्या वाढल्या आहेत.” निवडणूक लढवणाऱ्या सर्व इच्छुकांना उमेदवारी दिली जाईल आणि अर्ज भरण्याची वेळ योग्य वेळी कळवली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पत्रकार परिषद होण्याआधी राज आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं. त्यानंतर रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनीही पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

या पत्रकार परिषदेत मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना–मनसे एकत्र लढवणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. राज्यातील इतर महापालिकांबाबत चर्चा सुरू असून निर्णय होताच तिथेही युती जाहीर केली जाईल, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी ठाम विश्वास व्यक्त करत म्हटलं की, “मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार.”

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ