नाशिकचा भोंदू अशोक खरात सध्या कारागृहात असून त्याच्यावर महिला अत्याचार, लैंगिक शोषण, फसवणूक आणि पैशांची लूट असे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणाने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे, कारण काही नेते आणि लोकप्रतिनिधी त्याला भेटण्यासाठी जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी शिवसेनेच्या शिंदे गटातील नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावर थेट आरोप करत वादाला तोंड फोडले आहे. देसाई यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना काळाच्या आधीपासून गोऱ्हे या नाशिकमधील एका हॉटेलमध्ये खरातला भेटत होत्या आणि त्याला राजकीय पाठबळही देत होत्या. मात्र, या सर्व आरोपांना नीलम गोऱ्हे यांनी ठामपणे नाकारले असून, त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की त्यांनी कधीही अशोक खरातची भेट घेतलेली नाही.
यावर प्रतिक्रिया देताना तृप्ती देसाई यांनी पुन्हा एकदा आपले आरोप कायम ठेवले आहेत. त्यांनी सांगितले की, या प्रकरणासंबंधी माहिती देणाऱ्या दोन व्यक्ती आहेत. एक नाशिकमधील आणि दुसरी पुण्यातील. ही सर्व माहिती विशेष तपास पथक (SIT) तसेच राज्याचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासमोर सादर केली जाईल. योग्य वेळी सर्व पुरावे उघड केले जातील, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.




