प्रत्येकवेळी हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यापूर्वी किंवा शुभ मुहूर्तावर आणि धार्मिक कार्यक्रमांत नारळ फोडण्याची प्रथा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. पुरातनकाळापासून श्रीफळाला महत्वाचं स्थान आहे. त्याबरोबरच कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात हि नारळ फोडून केली जाते ते अत्यंत शुभ मानलं जातं. कारण नारळाला श्रीफळ म्हणजेच देवांचे आवडते फळ असेही म्हणतात. त्याबरोबरच नारळात अनेक औषधी गुणधर्म असून त्याचे बहुगुणी उपयोग हि आहेत. पण शुभ कार्यापूर्वी नारळ का फोडला जातो? माहित आहे का तुम्हाला? काय करणे असावीत या मागे जाणून घेऊया…
हिंदू धर्मात नारळ हे एक पवित्र फळ मानलं गेलं आहे आणि नारळाचा बाहेरील पृष्ठभाग अहंकाराचे व आतील पांढरा आणि मऊ पृष्ठभाग शांततेचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच अहंकाराचा त्याग करण्यासाठी नारळ फोडण्याची प्रथा आहे असे म्हणतात. तसेच नारळाच्या बाहेरील भागावर तीन खुणा असतात. त्या ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीक आहे असं मानलं जातं. नारळ हे सौभाग्य आणि समृद्धीचंही प्रतीक आहे. म्हणूनच कोणत्याही चांगल्या गोष्टीचा शुभारंभ करण्यापूर्वी सकारात्मक उर्जेला आमंत्रित करण्यासाठी नारळ फोडला जातो.
याशिवाय देवतांना नारळाचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे, म्हणूनच देवाला नारळ अर्पण केल्यानंतर तो प्रसाद म्हणून वाटला जातो. तर नारळातील पाणी हे अतिशय शुद्ध आणि पवित्र मानले जाते. नारळ पाणी घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते व ते आरोग्यासाठीही फायदेशीर असते. धार्मिक गोष्टी बाजूला ठेवल्या तर नारळाचे अनेक फायदे देखील आहेत. नारळाला सुपरफूड म्हणतात त्यामागील कारण असं कि त्यात पोषक घटक असतात. नारळ पाणी हे इलेक्ट्रोलाइट्सने समृद्ध असून त्यास नैसर्गिक एनर्जी ड्रिंक मानले जातं. याशिवाय नारळाचे तेल हे वजन नियंत्रण, त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असते.




