जागतिक तणाव आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे सोने 1.26 लाख, चांदी 1.61 लाखांवर
सोमवारी (14 ऑक्टोबर 2025) भारतात (India) सोन्या-चांदीच्या किमतींनी नवा उच्चांक गाठला, ज्यामुळे सणासुदी आणि लग्नसराईच्या काळात ग्राहकांच्या खिशावर मोठा ताण पडत आहे. इंडियन बुलियन असोसिएशननुसार, 24 कॅरेट सोन्याचा (Gold) दर प्रति 10 ग्रॅम 1,26,590 रुपये, तर चांदीचा (Silver) दर प्रति किलो 1,61,670 रुपये नोंदवला गेला. ही भाववाढ ग्राहकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे.24 तासांत भाववाढीचा भडिमार केवळ एका दिवसापूर्वी (13 ऑक्टोबर) सोन्याचा भाव 1,24,520 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो आता 2,070 रुपयांनी वाढून 1,26,590 रुपयांवर पोहोचला. त्याचप्रमाणे, चांदीचा दर काल 1,54,600 रुपये प्रति किलो होता, जो आज 7,070 रुपयांनी वधारून 1,61,670 रुपयांवर गेला आहे.
जागतिक अनिश्चितता कारणीभूत अमेरिका-चीनमधील (America – Chin) व्यापार तणाव, अमेरिकेतील संभाव्य शटडाऊन, आंतरराष्ट्रीय युद्ध परिस्थिती आणि आर्थिक अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित पर्यायांकडे वळत आहेत. यामुळे सोन्या-चांदीच्या किमतींवर थेट परिणाम झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, सणासुदीच्या काळात आणि लग्नसराईत ही वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.
शहरनिहाय सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम, 24 कॅरेट)
मुंबई: 1,26,590 रुपये
दिल्ली: 1,26,610 रुपये
कोलकाता: 1,26,660 रुपये
पुणे: 1,26,870 रुपये
चेन्नई: 1,27,240 रुपये
जागतिक सोन्याचे साठे
यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या अहवालानुसार, रशिया आणि ऑस्ट्रेलियाकडे जगातील सर्वात मोठे सोन्याचे साठे आहेत. रशियाचे वार्षिक सोने उत्पादन 310 मेट्रिक टन, तर ऑस्ट्रेलियाचे 320-330 मेट्रिक टन आहे. ऑस्ट्रेलियाकडे सुमारे 12,000 मेट्रिक टन साठे आहेत. कॅनडा (3,200 मेट्रिक टन), चीन (3,100 मेट्रिक टन) आणि अमेरिका (3,000 मेट्रिक टन) यांचा यात समावेश आहे.सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या या विक्रमी किमती ग्राहकांसाठी आव्हान ठरत असून, बाजारातील अस्थिरता कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.




