झी मराठीवरील ‘पारू’ ही लोकप्रिय मालिका अचानक बंद झाल्यानंतर प्रेक्षकांना धक्का बसला होता. मात्र आता त्या मालिकेतून प्रसिद्ध झालेला अभिनेता प्रसाद जवादे लवकरच नव्या भूमिकेत दिसणार आहे. ‘दीपज्योती’ ही नवीन मालिका एप्रिल महिन्यापासून झी मराठीवर सुरू होत असून, तिची कथा प्रेक्षकांना भावणारी ठरणार आहे.
ही मालिका ज्योती आणि तिच्या कुटुंबाभोवती फिरते. घरातील वडिलांच्या व्यसनाधीनतेमुळे संपूर्ण जबाबदारी मोठ्या भावावर येते आणि तो लहान वयातच शिक्षण सोडून कुटुंबासाठी झटतो. आर्थिक अडचणी असूनही कुटुंबात प्रेम आणि आपुलकी टिकून आहे. ज्योतीला मात्र शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे.
दुसरीकडे, एक श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंब दाखवण्यात आलं आहे. घरातील प्रमुख पुरुषोत्तम आणि त्यांची तीन मुलं स्वराज, दीप आणि विराज यांच्या नात्यांमध्ये गुंतागुंत आहे. विशेषतः दीप आणि त्याच्या वडिलांमधील तणाव ही कथानकाची महत्त्वाची बाजू आहे. आईच्या मृत्यूनंतर दीपवर दोष ठेवण्यात आल्याने त्याचं आयुष्य विस्कळीत होतं आणि तो व्यसनाच्या आहारी जातो.
एका अनपेक्षित घटनेनंतर या दोन वेगवेगळ्या जगांचा संगम होतो आणि दीप व ज्योतीचा प्रवास सुरू होतो. या दोघांची भेट आणि त्यातून उलगडणारी कथा प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.
या मालिकेत पूर्वा कौशिक प्रसाद जावडे यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच डॉ. गिरीश ओक आणि सुहास परांजपे यांच्याही भूमिका आहेत. यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. मालिकेचं लेखन अश्विनी अनगळ आणि सायली कुलकर्णी आणि इरफान मुजावर यांचे संवाद आहेत. दिग्दर्शन अमित सावर्डेकर यांनी केले आहे. भावना, संघर्ष आणि नात्यांची गुंफण असलेली ‘दीपज्योती’ ही मालिका १३ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.




