हिंदी सक्तीपासून विकास प्रकल्पांपर्यंत सगळं काही ‘चाचपणी’चाच भाग; दिल्लीहूनच सूत्रं हलवली जात असल्याचा दावा
मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान पुन्हा एकदा समोर आले असल्याचा दावा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केला आहे. एका संयुक्त मुलाखतीत बोलताना ठाकरे बंधूंनी गेल्या काही दिवसांतील अनेक घडामोडींचे दाखले देत हा डाव दिल्लीतूनच आखला जात असल्याचा आरोप केला.
राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून थेट भाष्य करत सांगितले की, “मराठी माणूस जागा आहे की झोपलेला, हे पाहण्यासाठीच हा प्रयोग करण्यात आला.” ही केवळ भाषा लादण्याची बाब नसून, मुंबईची ओळख आणि मराठी अस्मिता पुसण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. मुलाखतीच्या दुसऱ्या भागातही दोन्ही नेत्यांनी मुंबई वेगळी करण्याचा अजेंडा अजूनही सुरू असल्याचा ठाम दावा केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘चंद्र-सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ देणार नाही’ असे विधान केल्यानंतर ठाकरे बंधूंनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांची इच्छा चांगली असू शकते, पण प्रत्यक्ष निर्णय त्यांच्या हातात नाहीत. दिल्लीहून जे आदेश येतील, तेच पाळावे लागतात. “वरून सांगितलं की जमीन कुणाला द्यायची, तर सही करण्याशिवाय पर्याय राहत नाही,” असा टोला त्यांनी लगावला. त्यामुळे दिल्लीतील सत्ताधाऱ्यांच्या मनात नेमकं काय आहे, हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनीही मुंबईची संस्कृती हळूहळू संपवली जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. “कोणीही येतो आणि सांगतो की या भागाची भाषा गुजराती आहे, आमच्यावर हिंदी लादली जाते. मग मुंबई महाराष्ट्रात ठेवून केवळ नावापुरतंच काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यासोबतच मुंबईलगत सुरू असलेल्या मोठ्या विकास प्रकल्पांमागील हेतूंवरही ठाकरे बंधूंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. वाढवण बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, तसेच पालघर-ठाणे परिसरातील विकास योजना या खरंच मराठी माणसासाठी आहेत का, की इतर कुणाच्या फायद्यासाठी—असा थेट प्रश्न त्यांनी विचारला. गुजरात जवळ असल्यामुळेच उद्योग तिकडे वळवले जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. एकूणच, मुंबई केवळ भूभागाने नव्हे तर संस्कृतीनेही महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा इशारा ठाकरे बंधूंनी पुन्हा एकदा दिला आहे.




