ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या संशोधनाने जैवविविधतेला मिळाली नवी दिशा!
कोल्हापूरच्या तिलारी येथील निमसदाहरित जंगलात ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे प्रमुख संशोधक तेजस ठाकरे (Tejas Thackeray) आणि त्यांच्या चमूने पुन्हा एकदा पश्चिम घाटाच्या जैवविविधतेत मोलाचा खजिना शोधून काढला आहे. त्यांनी एका नव्या केसाळ गोगलगायीच्या प्रजातीचा शोध लावला असून, या अनोख्या प्रजातीला ‘लॅगोकाईलस हायाओमियाझाकी’ असे नाव दिले आहे. हे नामकरण जपानी अॅनिमेटर आणि स्टुडिओ घिबलीचे सह-संस्थापक हायाओ मियाझाकी यांच्या पर्यावरणप्रेमी तत्त्वज्ञानाला आदरांजली म्हणून करण्यात आले आहे. मियाझाकी यांच्या चित्रपटांमध्ये निसर्गाचे महत्त्व प्रभावीपणे दर्शवले जाते. हा शोध ‘जर्नल ऑफ कॉन्कॉलॉजी’ या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकात नुकताच प्रकाशित झाला आहे.“या लहान गोगलगायी निसर्गाचा अमूल्य ठेवा आहेत आणि अन्नसाखळीत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. अशा छोट्या प्रजातींवर संशोधनाला प्राधान्य देण्याचा आमचा मानस आहे,” असे तेजस ठाकरे यांनी सांगितले.
ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी यापूर्वीही अनेक दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला आहे. अलीकडेच त्यांनी ‘सह्याद्रीओफिस उत्तरघाटी’ नावाच्या सापाच्या नव्या प्रजातीचा शोध लावला, ज्याचे नामकरण संस्कृत ‘सह्याद्री’ आणि ग्रीक ‘ओफिस’ (साप) या शब्दांवरून करण्यात आले.याशिवाय, तेजस आणि त्यांच्या चमूने पालींच्या अनेक नव्या प्रजाती शोधल्या आहेत, ज्यात ‘क्नेमास्पीस केव्हरनीकोला’, ‘सी. पॅकामालियन्सेस’ आणि तामिळनाडूच्या शेवरॉय पर्वतरांगेत सापडलेली ‘क्नेमास्पीस ठाकरेई’ यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ‘क्नेमास्पीस ठाकरेई’ ही प्रजात तेजस यांच्या आडनावावरून नावबद्ध करण्यात आली आहे. यासोबतच, त्यांनी गोड्या पाण्यातील २० हून अधिक खेकड्यांच्या प्रजाती आणि सिंधुदुर्गातील आंबोली येथील हिरण्यकेशी नदीत ‘शिस्टुरा हिरण्यकेशी’ नावाच्या सोनेरी रंगाच्या माशाच्या प्रजातीचा शोध लावला आहे. या सर्व शोधांमुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या संरक्षणाला नवी दिशा मिळत आहे.




