आयपीएलनंतर अफगाणिस्तान आणि इंग्लंडविरुद्धही भिडणार ‘सूर्यासेना’
सूर्यकुमार यादव याच्या कल्पक नेतृत्वाखाली नुकताच ८ मार्च रोजी न्यूझीलंडचा पराभव करून भारताने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. या ऐतिहासिक विजयानंतर आता चाहत्यांचे लक्ष २८ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल २०२६ च्या १९ व्या मोसमाकडे लागले आहे. विशेष म्हणजे, आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघ विश्रांती न घेता थेट आयर्लंड दौऱ्यावर रवाना होणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. आयर्लंड क्रिकेटचे अधिकारी ग्राहम वेस्ट यांनी या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेची घोषणा केली असून, विश्वविजेत्या भारताचे यजमानपद भूषवण्यासाठी ते सज्ज आहेत.
टीम इंडियाचे आगामी वेळापत्रक अत्यंत व्यग्र असून आयर्लंड दौऱ्यानंतर लगेचच भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज होणार आहे. मात्र, त्यापूर्वी अफगाणिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून, दोन्ही देशांत प्रथमच ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि एक कसोटी सामना खेळवला जाणार आहे. हा दौरा २० जून रोजी समाप्त होईल. आयर्लंड संघ कागदावर कमकुवत वाटत असला, तरी त्यांनी अनेकदा मोठ्या संघांना धक्का दिला आहे. त्यामुळे विश्वविजेता बनल्यानंतर आता सूर्याची सेना आयर्लंडविरुद्ध कशी कामगिरी करते आणि त्यानंतर इंग्लंडमध्ये विजयाचा झेंडा फडकवते का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.




