अहमदाबादमध्ये किवींना नमवत भारताची ऐतिहासिक हॅट्ट्रिक; विजयाच्या जल्लोषात अर्शदीपच्या राड्याची चर्चा
भारतीय संघाने रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवत टी-२० विश्वचषक २०२६ वर आपले नाव कोरले. भारताचे हे तिसरे आणि सलग दुसरे विश्वविजेतेपद ठरले असून, घरच्या मैदानावर चषक उंचावणारा भारत पहिलाच संघ बनला आहे. मात्र, या ऐतिहासिक विजयाच्या आनंदाला अर्शदीप सिंगच्या एका आक्रमक कृतीमुळे गालबोट लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सामन्याच्या दुसऱ्या षटकात अर्शदीपने फेकला चेंडू थेट न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिशेलच्या खांद्याला लागला, ज्यामुळे मैदानावरील वातावरण चांगलेच तापले होते.
या घटनेनंतर मिशेलने संताप व्यक्त करत पंचांकडे तक्रार केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून कर्णधार सूर्यकुमार यादवने मध्यस्थी करत मिशेलला शांत केले. आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.९ नुसार, कोणत्याही खेळाडूच्या दिशेने धोकादायक पद्धतीने चेंडू फेकणे हे ‘लेव्हल १’ चा गुन्हा मानला जातो. जरी अर्शदीपने सामन्यानंतर मिशेलची माफी मागून वाद मिटवला असला, तरी आयसीसी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आहे. या नियमांतर्गत अर्शदीपला त्याच्या मॅच फीच्या ५० टक्क्यांपर्यंत दंड किंवा डिमेरिट पॉइंट्स मिळण्याची टांगती तलवार लटकत आहे.
यापूर्वी वेस्ट इंडिजच्या जेडेन सील्सला अशाच प्रकारच्या वर्तनासाठी दंड ठोठावण्यात आला होता, त्यामुळे अर्शदीपवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर अर्शदीपच्या खात्यात डिमेरिट पॉइंट्स जमा झाले, तर आगामी महत्त्वाच्या सामन्यांमध्ये त्याच्यावर बंदी येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे विश्वविजेतेपदाचा जल्लोष सुरू असताना, अर्शदीपच्या या ‘अति-आक्रमकतेमुळे’ भारतीय गोटात चिंतेचे वातावरण आहे.




