ब्लॅक कॉफीचे फायदे: वजन नियंत्रण, मेंदूची कार्यक्षमता आणि हृदयाचे संरक्षण
आपल्या देशात अनेक लोकांची सकाळची सुरूवात चहा किंवा कॉफीने होते. मात्र, चहा आणि कॉफीपैकी कोणते पेय आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे, यावर तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. आजकाल अनेक तज्ज्ञ ब्लॅक कॉफीला चहापेक्षा आरोग्यदायी मानतात.
ब्लॅक कॉफी आणि चहा यातील मुख्य फरक म्हणजे कॅफिनचे प्रमाण. एका कप ब्लॅक कॉफीमध्ये साधारण 90-100 मिग्रॅ कॅफिन असते, तर त्याच प्रमाणात चहामध्ये फक्त 25-50 मिग्रॅ कॅफिन असते. त्यामुळे ब्लॅक कॉफी आपल्या मेंदूला अधिक ऊर्जा देते, लक्ष केंद्रित ठेवते आणि मानसिक क्रियाशीलता वाढवते. सकाळी कार्यालयात किंवा अभ्यासासाठी ब्लॅक कॉफी पिणे मेंदूला चहापेक्षा अधिक सक्रिय ठेवते.
वजन कमी करण्यासाठीही ब्लॅक कॉफी उपयुक्त आहे. साखर किंवा दूध न घालता प्याल्यास ब्लॅक कॉफीमध्ये कॅलरीज फार कमी असतात आणि ती शरीरातील चयापचय वाढवते, तसेच फॅट बर्न करण्यास मदत करते. याउलट, साखर किंवा दूध घालून केलेल्या चहामुळे अतिरिक्त कॅलरीज मिळतात.
ब्लॅक कॉफीमध्ये पॉलीफेनॉल आणि क्लोरोजेनिक ॲसिड यांसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे जळजळ कमी करतात आणि हृदयरोग व मधुमेहाचा धोका कमी करतात. मेंदूच्या आरोग्यासाठीही ब्लॅक कॉफी फायदेशीर ठरते, स्मरणशक्ती वाढवते आणि अल्झायमर, पार्किन्सन सारख्या आजारांचा धोका कमी करते.
जिममध्ये व्यायाम करणाऱ्यांसाठी ब्लॅक कॉफी विशेष फायदेशीर आहे. व्यायामापूर्वी ब्लॅक कॉफी पिल्यास अॅड्रेनालाईनची पातळी वाढते, ताकद आणि सहनशक्ती सुधारते, ज्यामुळे व्यायाम अधिक प्रभावी होतो.
तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की, खऱ्या कॉफी बीन्सपासून बनवलेली ब्लॅक कॉफी पिणे उत्तम, आणि साखर, क्रीमर किंवा कृत्रिम फ्लेवर्स टाळणे आवश्यक आहे. थोडीशी दालचिनी मिक्स करणे चवीसाठी योग्य आहे. कमी प्रमाणात नियमित ब्लॅक कॉफी पिणे शरीर आणि मेंदूसाठी चहापेक्षा अधिक फायदेशीर ठरते.




