महागाईवर मात करण्यासाठी हायब्रिड मॉडेलचा आधार; गॅरंटीड पेआउट आणि गुंतवणुकीचा दुहेरी फायदा
वाढत्या महागाईच्या काळात केवळ सुरक्षित गुंतवणुकीवर अवलंबून राहणे आता निवृत्त व्यक्तींसाठी कठीण होत आहे. हीच गरज ओळखून Tata AIA लाइफ इन्शुरन्सने ‘शुभ फ्लेक्सी पेन्शन’ (Shubh Flexi Pension) हा एक नाविन्यपूर्ण प्लॅन सादर केला आहे. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे एक ‘हायब्रिड मॉडेल’ आहे. पारंपरिक पेन्शन योजनांमध्ये पैसे केवळ सुरक्षित सरकारी योजनांमध्ये (Debt Instruments) गुंतवले जातात, जिथे परतावा मर्यादित असतो. मात्र, या नवीन प्लॅनमध्ये पॉलिसीधारकांना त्यांच्या वार्षिकीचा १० ते ४० टक्के हिस्सा निफ्टी ५० (Nifty 50) इंडेक्समध्ये गुंतवण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे निवृत्तीनंतरही शेअर बाजारातील तेजीचा फायदा मिळून महागाईवर मात करणे शक्य होईल.
या योजनेमध्ये गुंतवणूकदारांना दोन पर्याय मिळतात: ‘इमिजिएट अॅन्युइटी’ (तात्काळ पेन्शन) किंवा ‘डिफर्ड अॅन्युइटी’ (काही काळानंतर सुरू होणारी पेन्शन). ज्यांना भविष्यातील तरतूद करायची आहे, ते प्रीमियम भरल्यानंतर २० वर्षांपर्यंत पेन्शन लांबणीवर टाकू शकतात. वयाच्या ३५ व्या वर्षापासून या प्लॅनमध्ये प्रवेश घेता येतो. तसेच, गुंतवणुकीसाठी एकरकमी रक्कम किंवा २ ते १२ वर्षांच्या हप्त्यांचा पर्याय उपलब्ध आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ‘खरेदी किंमतीचा परतावा’ या पर्यायामुळे पॉलिसीधारकाच्या निधनानंतर त्यांनी गुंतवलेली मूळ रक्कम त्यांच्या वारसाला (Nominee) सुरक्षितपणे परत मिळते.
वाढते आयुर्मान आणि आरोग्य सेवांचा वाढता खर्च पाहता, पारंपरिक पेन्शन योजना अपुऱ्या पडत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. टाटा एआयएने आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ३१,४८४ कोटी रुपयांचा निव्वळ प्रीमियम मिळवत २३ टक्क्यांची उल्लेखनीय वाढ नोंदवली आहे. सध्या खाजगी आयु विमा क्षेत्रात पहिल्या तीन कंपन्यांमध्ये स्थान मिळवलेल्या टाटा एआयएचा हा नवीन प्लॅन, सुरक्षितता आणि परतावा यांचा सुवर्णमध्य शोधणाऱ्या ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.




