नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोड सध्या राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण करत आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारण्यासाठी जवळपास १७०० ते १८०० झाडे हटवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परंतु या निर्णयावर पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था, कलाकार आणि काही राजकीय नेत्यांनी तीव्र विरोध नोंदवला आहे.
या वादात भाजपचे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलेल्या विधानाने आणखी खळबळ उडवली. वृक्षतोडीचा विरोध करणाऱ्या पर्यावरणवाद्यांनी ईदच्या वेळी होणाऱ्या प्राणीवधाला कधी विरोध केला नाही, असे राणे यांनी म्हटल्याने नवीनच चर्चा रंगली. त्यावर शिवसेना ठाकरे गटाने जोरदार प्रत्युत्तर देत हा विषय धर्माचा नसून पर्यावरणाचा असल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेचे अखिल चित्रे यांनी राणे यांच्यावर टीका करत त्यांची ‘टिल्लू-लेव्हल बुद्धी’ अशी टोमणेभरी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, तपोवनातील ५४ एकर जागेवर साधुग्राम बांधण्याची तयारी सुरू असून झाडांची दाटी अडथळा ठरत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यांच्या मते, २०१५-१६ च्या गुगल मॅपनुसार त्या भागात झाडे नव्हती; ती राज्य शासनाच्या ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेत लावली गेली होती. दुसरीकडे, विरोधकांचा सवाल कायम आहे. पर्यायी जागा उपलब्ध असूनही याच ठिकाणी वृक्षतोड करण्याचा आग्रह का?
अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) आणि इतर पर्यावरणप्रेमी या निर्णयाविरोधात आंदोलन करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही सयाजी शिंदे यांच्या चिंता योग्य असल्याचे म्हणत समस्येचा समन्वयातून तोडगा काढावा, असे प्रशासनाला आवाहन केले आहे.




