spot_img

T20 World Cup : टी-20 वर्ल्ड कपआधी पाकिस्तानचा पेच; खेळायचं की नाही यावर अजूनही सस्पेन्स

spot_img

बांगलादेश बाहेर, स्कॉटलँडला संधी; भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्काराची चर्चा

टी-20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला येत्या 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून स्पर्धेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मात्र ऐनवेळी काही संघांच्या भूमिकेमुळे आयसीसीला डोकेदुखी वाढली आहे. बांगलादेशने घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळे त्यांना स्पर्धेबाहेर काढत स्कॉटलँडला संधी देण्यात आली आहे. त्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अनिश्चिततेचे नवे नाट्य सुरू केले आहे.

पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या म्हणण्यानुसार, या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब येत्या काही दिवसांत होणार आहे. पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी 26 जानेवारी रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेतली. जवळपास तासभर चाललेल्या या बैठकीत वर्ल्ड कप सहभागावर सविस्तर चर्चा झाली.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मोहसिन नक्वी यांनी सांगितले की, “स्पर्धेत खेळायचे की नाही याबाबतचा अंतिम निर्णय 30 जानेवारी किंवा सोमवारी 2 फेब्रुवारीला घेतला जाईल.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, पंतप्रधानांनी या प्रकरणात सर्व पर्याय खुले ठेवण्याचे निर्देश दिले असून, तोडगा काढण्यावर भर दिला आहे.

या बैठकीनंतर पाकिस्तानी मीडियात मोठे दावे केले जात आहेत. काही वृत्तांनुसार पाकिस्तानचा संघ टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होऊ शकतो, मात्र 15 फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच भारताविरुद्धचा सामना वगळता पाकिस्तान इतर सामने खेळू शकतो, असा दावा केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून पुढील काही दिवसांपर्यंत नाट्यमय घडामोडी सुरू राहणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आयसीसीलाही पर्यायी योजना तयार ठेवावी लागणार आहे. जर पाकिस्तानने ऐनवेळी स्पर्धेतून माघार घेतली, तर युगांडा संघाला तयारीसाठी आधीच कळवणे आवश्यक ठरणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे, पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की, टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहभागाचा अंतिम निर्णय पाकिस्तान सरकारच घेणार आहे. सरकार जे आदेश देईल, त्यानुसारच क्रिकेट बोर्ड निर्णय घेईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले होते.

एकूणच, वर्ल्ड कप सुरू होण्याच्या अगदी तोंडावर पाकिस्तानच्या भूमिकेमुळे आयसीसी आणि क्रिकेट विश्वात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ