टी-२० विश्वचषक २०२६: सलग ३ वेळा शून्यावर बाद होऊनही फायनलमध्ये गाजवलं मैदान; फलंदाजीपूर्वी नेमकं काय घडलं?
टी-२० विश्वचषक २०२६ च्या थरारक अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करत विश्वविजेतेपदावर मोहोर उमटवली. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे युवा सलामीवीर अभिषेक शर्मा. ज्या अभिषेकला खराब फॉर्ममुळे संघातून डच्चू देण्याची मागणी होत होती, त्यानेच फायनलमध्ये २१ चेंडूत ५२ धावांची सुसाट खेळी करून टीकाकारांची बोलती बंद केली. मात्र, या वादळी खेळीनंतर अभिषेकने एक असा खुलासा केला आहे, जो ऐकून क्रिकेटप्रेमी थक्क झाले आहेत.
अभिषेकने सांगितले की, अंतिम सामन्यात त्याने स्वतःच्या नव्हे तर संघातील सहकारी शिवम दुबेच्या बॅटने फलंदाजी केली होती. स्पर्धेच्या सुरुवातीला सलग तीन सामन्यात शून्यावर बाद झाल्यामुळे अभिषेकचा आत्मविश्वास डळमळीत झाला होता. दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. अशा कठीण काळात कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी त्याच्यावर विश्वास कायम ठेवला.
“सकाळी मला वाटलं की आज काहीतरी वेगळं करायला हवं. शुभमन गिल सोबत नव्हता, म्हणून मी थेट शिवम दुबेकडे गेलो आणि त्याची बॅट मागून घेतली,” असं अभिषेकने विजयानंतर हसत हसत सांगितलं. विशेष म्हणजे, याच स्पर्धेत नशीब अजमावण्यासाठी त्याने एकदा मोहम्मद सिराजची जर्सीही घालून पाहिली होती, पण तेव्हा ‘लक’ चाललं नाही. मात्र, फायनलमध्ये दुबेची बॅट त्याच्यासाठी ‘लेडी लक’ ठरली आणि त्याने २४७.६२ च्या स्ट्राईक रेटने मैदानात चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. अभिषेकच्या या ‘उधार’ घेतलेल्या बॅटने भारताला २५५ धावांच्या हिमालयीन धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली.




